शिखर बँक घोटाळा : शरद पवार आज स्वत:हून जाणार ईडीच्या दरबारात !! परिसरात लावले १४४ कलम

मी उद्या ठरल्याप्रमाणे सक्तवसुली संचालनालयाच्या ( ED) कार्यालयात जाणार आहे. त्यामुळे या परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना केलेले असले तरी ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आपण ईडीच्या कार्यालयावर कोणत्याही परिस्थितीत धडकणार असल्याचे ट्विटरवरून स्पष्ट केले आहे. दरम्यान ईडीच्या कार्यालय परिसरात प्रशासनाने कलम १४४ लागू करून जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
शरद पवार यांच्या ट्विटनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पवारांना टॅग करून एक भावनिक ट्विट केले आहे. ” माफ करा साहेब, ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार…महाराष्ट्र घडवताना तुम्हाला ज्या वेदना झाल्या आहेत. त्या आम्ही बघितल्या आहेत. कर्करोग, मांडीच्या हाडावर झालेली शस्त्रक्रिया, पायाला झालेली जखम…तरीही तुम्ही लढताय वयाच्या ७९ व्या वर्षी. हे सर्व तुम्ही आमच्यासाठी सोसलंय. त्यामुळे तुम्ही आम्हाला ईडीच्या कार्यालयावर जमू नका असे आदेश दिले असले तरी आम्हाला ते मान्य नाहीत. उद्यासाठी आम्हाला माफ करा, ” असे म्हणत आव्हाड यांनी उद्या ईडी कार्यालयावर धडकणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यात शरद पवार यांच्या नावाचाही समावेश आहे. ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे हे कळल्यानंतर त्यांच्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे, असे पवार यांनी सांगितले होते. पुढील काही दिवस मी निवडणूक प्रचारासाठी मुंबईच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे. ईडीला मला काही प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल आणि मी उपलब्ध नसेल किंवा कोणत्या अदृश्य ठिकाणी गेलो तर, त्याआधीच २७ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात मी स्वतःहून जाणार असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.