अमिताभ बच्चन ‘बिग बी’ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने ही माहिती आज दिली आहे.
अमिताभ बच्चन यांचे नाव सर्वसंमतीने निवडण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. बिग बी यांनी दोन दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. अमिताभ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण देश तसेच परदेशातील लोकांना आनंद झाला आहे. माझ्याकडून अमिताभ यांना मनपूर्वक शुभेच्छा, असे जावडेकर यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.
अमिताभ बच्चन यांनी १९६९ साली ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर बिग बी यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ७६ व्या वर्षीही अमिताभ यांच्याकडे अनेक चित्रपट येत आहेत. झुंड, साय रा नरसिम्हा रेड्डी, तेरा यार हूं मैं, बटरफ्लाय, एबी यानी सीडी, ब्रम्हास्त्र, चेहरे और गुलाबो सिताबो या चित्रपटात अमिताभ प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ यांनी मोठ्या पडदा तर गाजवला आहे तसेच त्यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची भूरळ घातली आहे. रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीमधील त्यांचे सूत्रसंचालन खूप लोकप्रिय आहे.