चर्चेतली बातमी : अजित पवारांपाठोपाठ शरद पवारही “ईडी “च्या फेऱ्यात, पवारांकडून स्वागत पण ते म्हणतात ‘ मी कुठल्याही बँकेचा संचालक नव्हतो “

हाय कोर्टाच्या आदेशामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम पाठोपाठ अजित पवारांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत थेट शरद पवारांनांही ईडीच्या फेऱ्यात टाकल्यामुळे राष्ट्वादीच्या चिंतेत भर पडेल यात शंका नाही. या सर्व नेत्यांवर नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप आहे.
दरम्यान एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार यांनी या विषयावर बोलताना सांगितले कि , शिखर बँक घोटाळा प्रकरणात माझ्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. ते पुढे म्हणाले कि , ” माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर मी या निर्णयाचे स्वागत करतो. मी कधीही कोणत्याच बँकेचा संचालक नव्हतो. ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती नाही”. ” माझ्या दौऱ्यांना जो काही प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे ही कारवाई होते आहे” असाही आरोप शरद पवार यांनी केला. यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार हा घोटाळा २५ हजार कोटींचा असल्याचे वृत्त आहे. सहकारी बँकेची आर्थिक स्थितीत कमकुवत असतानाही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आलं. कर्ज वाटप करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता होती, असा ठपका ईडीने ठेवला आहे. तसेच सहकारी साखर कारखाने आजारी पडल्यानंतर चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासाठी अतिशय कमी किमतीत विकले गेल्याचे ईडीने म्हटले आहे. दरम्यान हे सहकारी साखर कारखाने काही विशिष्ट राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकल्या गेल्याचा दावाही ईडीने केला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अतिशय मनमानीने कर्ज वाटप केले होते. यामुळे बँकेला तब्बल १० हजार कोटींचं नुकसान झालं होतं. या प्रकरणात अण्णा हजारे यांनी तीन वर्षांआधीच याचिका दाखल केली होती. याप्रकरणी चौकशी समिती देखील नेमण्यात आलेली होती. चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर अखेर कोर्टाने याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आता तब्बल ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते. अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील आणि शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आले होते. मात्र आता ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केल्याने शरद पवार आणि अजित पवारांवरही गुन्हे दाखल केल्याचं वृत्त आहे.