Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप -सेना युतीची पत्रकार परिषद झालीच नाही , अमित शहा यांचा मुंबई दौराही रद्द

Spread the love

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होऊन उद्या पत्रकार परिषदेत हे दोन्हीही नेते युतीची घोषणा करतील अशी हाकाटी माध्यमांनी पिटवली होती मात्र तसे काही झालेच नाही. त्याच्या आधी रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले अमित शहा यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा होईल असे ढोल बडविण्यात आले परंतु अमित शहा यांनी युतीची घोषणा करणे तर दूरच पण शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचे सभेत नावही घेतले नाही.

आज पत्रकार परिषदेचा गाजावाजा करण्यात आला होता परंतु दिवस मावळला तरी पत्रकार परिषदेचे निमंत्रण पत्रकारांना मिळाले नाही. दरम्यान भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या  दुसऱ्या मुंबई दौऱ्यात युतीची घोषणा होईल असे सांगितले जात होते परंतु अचानक अमित शहा यांचा २६ सप्टेंबर रोजीचा मुंबई दौरा रद्द झाल्याचे वृत्त धडकले असल्याने युती होणार कि नाही यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान ठरल्याप्रमाणे निम्म्या जागा मिळणार नसतील तर युती कठीण असल्याचे दिवाकर रावते यांचे विधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्थिर सरकार बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन यामुळे युतीचं भवितव्य काय अशी चर्चा सुरु आहे. शिवसेना आणि भाजपाचे नेतेदेखील उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात चर्चा सुरु असल्याचं सांगत बोलणं टाळत आहेत. दरम्यान खा. संजय राऊत यांनी तर  युतीची तुलना थेट भारत पाकिस्तानशी केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागावाटपाची विविध समीकरणे चर्चेत येत आहेत. ठरल्याप्रमाणे जागा मिळणार नसतील तर युती कठीण असल्याचे विधान शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. त्यावर जागावाटपाच्या चर्चेत अधिकार नसलेल्यांनी युतीबाबत बोलू नये असा टोला भाजपचे नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला. त्यामुळे युतीत कुरबुरींवर शिक्कामोर्तब झाले.

‘फडणवीस यांनी बहुमत नसलेले अस्थिर सरकार चांगल्यारितीने चालवले. आता त्यांना बहुमताचे सरकार द्या’, असे नाशिकमधील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यातून भाजपला केंद्राप्रमाणे राज्यातही बहुमतासाठी घटक पक्षांच्या कुबडय़ांची गरज नसलेले स्पष्ट बहुमताचे सरकार हवे असल्याचा संदेश मोदी यांनी थेटपणे दिला. तसेच राम मंदिरावरून काही जण मोठय़ा बाता मारत असल्याचा टोला मारला. राम मंदिराची पहिली वीट रचण्यासाठी शिवसैनिकांनी तयार रहावे, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत केले होते. मोदी यांनी त्यावरूनच उद्धव यांच्यावर निशाणा साधल्याचे मानले जात आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!