रमजानदरम्यान उमरासाठी गेलेले महाराष्ट्रातील 50 हजार ते 1 लाख भाविक सौदीत अडकण्याची भीती; अल्पसंख्यांक आयोगाची तातडीची हालचाल
रमजानच्या पार्श्वभूमीवर ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी मक्का – मदीना (Mecca – Medina) येथे गेलेले महाराष्ट्रातील सुमारे 50 हजार ते 1 लाख मुस्लिम बांधव सौदी अरेबिया (Saudi Arabia) मध्ये अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान (Pyare Khan) यांनी सांगितले की, यंदा राज्यातील 500 हून अधिक टूर ऑपरेटर्समार्फत भाविक उमरासाठी सौदी अरेबियात गेले आहेत. त्यापैकी केवळ मुंबईतूनच 100 हून अधिक ऑपरेटर्स सक्रिय होते.
सरकारी नोंदणी नसल्याने अडचण
हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची अधिकृत नोंद सरकारकडे असते. मात्र उमरासाठी जाणाऱ्यांची कोणतीही केंद्रीकृत नोंदणी नसते. बहुतांश भाविक खासगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या माध्यमातून प्रवास करतात. त्यामुळे नेमका आकडा सांगणे कठीण होत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
अल्पसंख्यांक आयोगाची तातडीची मोहीम
सौदी अरेबियात उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील भाविकांची अचूक संख्या निश्चित करण्यासाठी सर्व टूर ऑपरेटर्सशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत नेमकी माहिती स्पष्ट होईल, असे प्यारे खान यांनी सांगितले.
या संदर्भात आयोग राज्य सरकारच्या संपर्कात असून सर्व भाविकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी आवश्यक ती मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशीही संपर्क साधण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आर्थिक अडचणींची शक्यता
उमरासाठी मोठ्या प्रमाणावर गरीब आणि मध्यमवर्गीय मुस्लिम बांधव प्रवास करतात. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास त्यांचा मुक्काम वाढू शकतो, ज्यामुळे निवास, अन्न व इतर खर्चांमुळे आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय दूतावासाकडून मदतीचे प्रयत्न सुरू असून अधिक समन्वयाची गरज असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव, शहर आणि जिल्ह्यातून भाविक उमरासाठी जात असल्याने ही बाब राज्यातील हजारो कुटुंबांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
