युतीचा डाव फसला! वंचितकडून 16 जागांवर उमेदवारच नाहीत, काँग्रेसची मोठी अडचण
मुंबई महापालिकेत काँग्रेस–वंचित युतीला पहिलाच धक्का. 62 जागा देऊनही वंचितने फक्त 46 ठिकाणीच भरले अर्ज. मुदत संपल्यानंतर माहिती दिल्याने काँग्रेसच्या हातातून संधी गेली.
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीच्या युतीत मोठा तिढा निर्माण झाला आहे. काँग्रेसने मोठ्या विश्वासाने वंचितला 62 जागा सोपवल्या असताना, वंचितने प्रत्यक्षात केवळ 46 जागांवरच उमेदवारी अर्ज भरल्याचं समोर आलं आहे. उर्वरित 16 जागांवर उमेदवारच न मिळाल्याने अर्ज भरले गेले नाहीत, आणि ही माहिती अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर काँग्रेसला देण्यात आली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी युती टिकवण्यासाठी अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद असतानाही त्या जागा वंचितला दिल्या होत्या. मात्र, मुंबईत संघटनात्मक ताकद मर्यादित असल्यानं वंचितला अनेक प्रभागांत उमेदवार उभे करता आले नाहीत. वंचितकडून वेळेत माहिती न दिल्यामुळे काँग्रेसलाही त्या 16 जागांवर एबी फॉर्म देऊन उमेदवार उभे करता आले नाहीत.
ही बाब अर्ज भरण्याची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर समोर आल्याने काँग्रेसला त्या 16 जागांवर अधिकृत उमेदवार देता आले नाहीत. विशेष म्हणजे, या जागांपैकी काही प्रभागांमध्ये काँग्रेसची चांगली ताकद होती. तरीही युतीत बिघाड होऊ नये म्हणून काँग्रेसने त्या जागा वंचितला दिल्या होत्या. आता मात्र या जागांवर काँग्रेसला अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या बंडखोर उमेदवारांनाच अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे युतीचा निर्णय काँग्रेससाठी डोकेदुखी ठरल्याचं चित्र आहे.
या घडामोडीमुळे मुंबईत काँग्रेसच्या रणनीतीला मोठा फटका बसला असून, युतीतील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. विशेष म्हणजे 1999 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस राज्यातील महापालिकांमध्ये मोठ्या संख्येने जागा लढवत असताना, मुंबईतील ही चूक पक्षासाठी महागात पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेस राज्यभरात आक्रमक भूमिका घेत असून
मुंबई (167), ठाणे (101), पुणे (100), पिंपरी-चिंचवड (60), छत्रपती संभाजीनगर (100) जागांवर काँग्रेस निवडणूक लढवत आहे. नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेस स्वबळावर मैदानात आहे.
मुंबई महापालिकेतील हा प्रकार काँग्रेस–वंचित युतीच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा ठरेल का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

