Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“दिल्लीमध्ये दोन दिवस राहिलो की आजारी पडतो” — गडकरींचा धक्कादायक अनुभव…

Spread the love

राजधानी दिल्लीची हवा इतकी खराब की केंद्रीय मंत्र्यांनाही त्रास

पेट्रोल-डिझेलमुळे दिल्लीतील ४०% प्रदूषण, गडकरींची स्पष्ट कबुली

इलेक्ट्रिक व हायड्रोजन वाहनांकडे वळणं म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रहित.

दिल्लीतील वाढत्या वायूप्रदूषणाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अत्यंत साध्या पण परिणामकारक शब्दांत गंभीर वास्तव मांडलं आहे.

“मी दिल्लीमध्ये फक्त दोन दिवस राहतो आणि लगेच आजारी पडतो. इतकी हवा प्रदूषित झाली आहे,” असं गडकरी यांनी My Idea of Nation First – Redefining Unalloyed Nationalism या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात स्पष्टपणे सांगितलं.

गडकरी म्हणाले की, दिल्लीतील एकूण प्रदूषणापैकी सुमारे ४० टक्के प्रदूषण हे वाहनांमधून होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या ज्वलनामुळे आहे.

“मी स्वतः वाहतूक मंत्री आहे आणि हे मान्य करतो की यामध्ये आमचाच मोठा वाटा आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

पेट्रोल-डिझेल म्हणजे प्रदूषणाची आयात

देश अजूनही मोठ्या प्रमाणावर इंधन आयातीवर अवलंबून आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले,

“आपण दरवर्षी जवळपास २० लाख कोटी रुपये पेट्रोल-डिझेल आयातीवर खर्च करतो. म्हणजे आपण पैसे देऊन प्रदूषण आयात करतोय. हे कोणतं राष्ट्रप्रेम आहे?” त्यांच्या मते, आयात कमी करणे आणि देशांतर्गत पर्याय उभे करणे हेच खरे राष्ट्रहित आहे.

भारताकडे स्वच्छ आणि पर्यायी इंधन तयार करण्याची क्षमता असल्याचं सांगत गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या भूमिकेवर भर दिला.

“आपला अन्नदाता शेतकरी आता ऊर्जा आणि इंधनदाताही झाला आहे. बायोफ्युएल, हायड्रोजन, अगदी विमान इंधनसुद्धा देशात तयार होत आहे, पण त्यावर विश्वास ठेवायला आपण तयार नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

इलेक्ट्रिक वाहनांबाबत असलेला ‘महाग’ असा समज चुकीचा असल्याचं सांगत गडकरी म्हणाले की, बॅटरीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

“पूर्वी बॅटरी महाग होती, आता ती खूप स्वस्त झाली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा चालण्याचा खर्चही कमी झाला आहे.” “पूर्वी लिथियम बॅटरीचा खर्च १५० डॉलर प्रति किलोवॅट तास होता, तो आता ५५ डॉलरपर्यंत घसरला आहे.”

हायड्रोजन वाहनांबाबत त्यांनी सांगितलं की, “हायड्रोजन वाहन प्रदूषण करत नाही आणि त्याचा खर्च साधारण २५ रुपयांच्या पेट्रोल इतका येतो.”

दरम्यान, दिल्लीतील हवेची गुणवत्ता अजूनही, अत्यंत खराब स्थितीत आहे. आनंद विहार (AQI 466), अशोक विहार (444) आणि चांदणी चौक (425) येथे हवेची स्थिती अतिशय खराब नोंदवली गेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स अ‍ॅक्शन प्लॅनचा चौथा टप्पा (Stage IV) लागू करण्यात आला असून धूळ नियंत्रणासाठी पाण्याच्या फवारणीसारखी उपाययोजना सुरू आहे. अनेक भागांत AQI ४५० च्या पुढे गेल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे सरकारकडून कडक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

गडकरींच्या या विधानांमुळे दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, स्वच्छ वाहतूक ही केवळ पर्यावरणाची गरज नाही, तर देशाच्या भविष्यासाठी अनिवार्य आहे, हा मुद्दा ठळकपणे पुढे आला आहे.


https://amzn.to/4shvKlK

आपलं सरकार

Click to listen highlighted text!