Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

छत्रपती संभाजीनगरात एन्काउंटर; पोलिसांवर गोळीबार व गाडी घालणारा दरोडेखोर चकमकीत ठार

Spread the love

छत्रपती संभाजीनगर : शहराजवळील वाळूज एमआयडीसी मधील वडगाव सागतपुरी रोडवरील एका हॉटेलजवळ सोमवारी (२६ मे) मध्यरात्री पोलिसांनी सापळा रचून एका गुन्हेगारी इतिहास असलेल्या आरोपीला एन्काउंटरमध्ये ठार केले. अमोल खोतकर असं मृत आरोपीचं नाव असून तो उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी होता.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल खोतकर हा वाळूज एमआयडीसी मध्ये सोमवारी रात्री एका हॉटेलवर येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने वडगाव साजापूर रोडवरील हॉटेल परिसरात रात्री साडेअकरा वाजता सापळा रचला. ठरल्याप्रमाणे खोतकर त्या ठिकाणी दाखल झाला. मात्र, त्याला समोर पोलीस दिसल्यानंतर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न करताच गोळीबार केला आणि गाडी पोलिसांच्या दिशेने जोरात चालवली.

या अचानक झालेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता, आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल एपीआय रविकिरण गच्चे यांनी गोळीबार केला. या गोळीबारात खोतकर गंभीर जखमी झाला आणि त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अमोल खोतकर याच्यावर लड्डा दरोडा प्रकरणासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. तो गेल्या काही महिन्यांपासून फरार होता आणि त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता.

काय आहे लड्डा दरोडा प्रकरण

बुधवार, १५ मे रोजी मध्यरात्री २ ते ४ या वेळेत लड्डा यांच्या बंगल्यावर सहा दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला होता. यावेळी घरात झोपलेल्या लड्डा यांच्या चालकाचे तोंड चिकटपट्टीने आणि हात रुमालाने बांधण्यात आले होते. दरोडेखोरांनी त्याच्या छातीवर पिस्तूल रोखून ५.५ किलो सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, ३२ किलो चांदीचे दागिने आणि ७० हजारांची रोख रक्कम असा एकूण लाखोंचा ऐवज लुटून नेला होता. विशेष म्हणजे, ही घटना एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर घडली होती.

अशी झाली चकमक

दरम्यान, या प्रकरणी संशयित आरोपी अमोल खोतकर हा योगेश हसबे याच्याकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री सापळा रचण्यात आला. रात्री सुमारे ११ वाजता खोतकर वडगाव कोल्हाटी येथील हसबे यांच्या हॉटेलजवळ कार घेऊन आला. मात्र, पोलिसांना समोर पाहताच त्याने गोळी झाडली व कार वेगात चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पायावरून गाडी गेली. त्यानंतर एपीआय रवी किरण गच्चे यांनी प्रतिउत्तरादाखल गोळीबार करत खोतकरचा एन्काऊंटर केला. त्याच्यासोबत असलेल्या एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!