Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SantoshDeshmukhMurderCase : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशीचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप ,आज बीड शहरात बंद

Spread the love

बीड : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशीचे क्रौर्याची परिसीमा गाठणारे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक होताना दिसून येत आहेत. रात्रीपासूनच बीड बंदची हाक देणारी पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून येत असून सकाळपासून बंदच्या अनुषंगाने बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांकडूनही बंदला पाठिंबा देण्यात आला आहे . अद्याप कोणताही पक्ष अथवा संघटनेकडून अधिकृत भूमिका मांडलेली दिसून आलेली नाही. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचा परिणाम म्हणून आज बीड बंद होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान आज मराठा आंदोलन मनोज जरांगे हे देखील मस्साजोगमध्ये दाखल होणार असून ते देशमुख कुटुंबाला धीर देणार आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेत वाल्मिक कराडच्या गँगने संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारतानाचे फोटो, व्हिडीओ सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशीचे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक होताना दिसून येत आहेत. प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. एरवी सकाळपासून आपली आस्थापने खुली करण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग पाहायला मिळते. मात्र या बंदच्या अनुषंगाने बाजारपेठा बंद ठेवल्या गेल्या आहेत. देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी. अशी मागणी यादरम्यान केली जाते आहे.

बीड पोलीस अधीक्षकांचे जनतेला आवाहन

दरम्यान बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीडच्या नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात एक पत्रक जारी करण्यात आली असून केलेल्या पत्रकानुसार, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभाग यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यात तपासाचा भागा असलेले काही फोटो आणि व्हिडीओ माध्यमांवर प्रसारित झाले असून समाजमाध्यमांवर प्रतिक्रीया उमटत आहेत. यासंदर्भात कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातील धक्कादायक तपशील समोर आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांना हाल हाल करुन मारतानाचे व्हिडीओ, फोटो आणि फोनवरील संभाषणांचा समावेश आहे. यापैकी एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. संतोष देशमुख यांना ठार मारण्यापूर्वी वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यामध्ये फोनवरुन बोलणे झाले होते.

यावेळी वाल्मिक कराड याने पवनचक्की प्रकल्पाचे काम बंद करण्याचे फर्मान सोडले होते. हे काम आहे त्या परिस्थितीत बंद करा, असा दम वाल्मिक कराड याने पवनचक्की कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना दिला होता. 23 नोव्हेंबरला राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. निवडणुका संपल्याने मी आता मोकळा झालोय, असे वाल्मिकने या संभाषणात म्हटले आहे. या संभाषणाचा तपशील पोलिसांच्या हाती लागला होता. हा सर्व तपशील आणि फोटो सोशल मीडियावर आणि सर्व टीव्ही चॅनल वर व्हायरल झाले असल्याने उद्रेक होत आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी यांचा मनाई हुकूम जारी

मराठा-ओबीसी आरक्षण वाद, संतोष देशमुख हत्याकांड यामुळे गेल्या काही महिन्यापासून बीड चर्चेत आलं आहे. बीडमधील गुन्हेगारी, राजकीय मोर्चे आणि त्यात २ समाजात असलेला तणाव पाहता जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते. त्यातच ३ तारखेला संतोष देशमुख हत्याकांडाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यातून संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीडमध्ये अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मनाई हुकूम जारी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!