MaharashtraPoliticalNewsUpdate : अखेर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला….कोण काय काय म्हणाले?

मुंबई : अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (4 मार्च) अखेर राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते.
9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली होती. धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि त्यांचा राईट हँड अशी ख्याती असलेला वाल्मिक कराड या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचे आरोप झाले होते. सुरुवातीला बीड पोलिसांनी याप्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यापासून ते तपासात प्रचंड कुचराई केली होती. अखेर याप्रकरणावरुन प्रचंड रोष निर्माण होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीआयडी आणि एसआयटीने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला होता. यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे सीआयडीने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. नुकतेच याप्रकरणात 1500 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले होते.
प्रकरण काय आहे ?
वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ओळखला जात होता. धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळातील प्रचाराचे व्यवस्थापन ते त्यांच्या अनुपस्थितीत बीड जिल्ह्यातील कारभाराची जबाबदारी वाल्मिक कराडच्या खांद्यावर होती, असे सांगितले जाते. वाल्मिक कराड याने आवादा या पवनचक्की निर्मिती कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यावरुन कंपनी प्रशासन आणि वाल्मिक कराड यांच्यात वाद होते. या वादातून वाल्मिक कराडचे सहकारी आवादा कंपनीत गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. हा सुरक्षारक्षक मस्साजोग गावातील असल्याने सरपंच संतोष देशमुख आवादा कंपनीत गेले होते. त्याठिकाणी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी वाल्मिक कराडच्या टोळीच्या लोकांना मारहाण केली होती. 6 डिसेंबर 2024 रोजी हा वाद झाला होता. त्यानंतर या भांडणाचा डुख मनात ठेवून वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरुन त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली होती. संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.
धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर कोण काय काय म्हणाले?
धनंजय मुंडेंचा राजीनामा मी स्वीकारला आहे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इतके दिवस कोणाची वाट बघत होतात?- जितेंद्र आव्हाड
तुम्हाला माहिती होती आणि फोटो सरकारकडे होते तर ते इतके दिवस का थांबले?, कोणाची वाट तुम्ही बघत होता?,दबाव असेल किंवा काही असेल राजीनामा घेण्यासंदर्भात भूमिका उशिरा का घेतली?, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन देखील केले.
हा राजीनामा नाही, हकालपट्टी- करुणा शर्मा
धनंजय मुंडेंचा हा राजीनामा नाही, तर हकालपट्टी आहे. तीन महिन्यांनी का होईना राजीनामा झालाय. या माणसाला मंत्रापदाचीही शपथ देऊ नका हे मी सांगत होते, असं करुणा शर्मा म्हणाल्या.
मी कार्यक्रम झाल्यावर माहिती घेऊन माध्यमांशी बोलते- पंकजा मुंडे
मी विमानातून आताच उतरले आहे, मला याबद्दल अजून काही माहिती नाही. राज्यपाल महोदयांसोबत मी आहे. मी कार्यक्रम झाल्यावर माहिती घेऊन माध्यमांशी बोलते, असं मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
धनंजय मुंडेंना काढून फेकायला पाहिजे : मनोज जरांगे
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, धनंजय मुंडेंना काढून फेकायला पाहिजे. दीड-दोन महिन्यात काय झाले हे आम्हाला माहीत नाही. मी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगत आहे. त्याला आमदारकीसकट मंत्रीपदावरून काढून टाका आणि 302 मध्ये घ्या. नाहीतर तुम्हाला उद्रेकाला सामोरे जावे लागेल. मी तुम्हाला सांगतोय, मला पुन्हा पुन्हा डिवचू नका, असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिलाय.
संतोष भैय्यांचा बदला होणार
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, तुमच्यासोबत हत्या करणारी टोळी असल्यावर तुम्हाला खूप भोगावे लागणार आहे. तुम्ही साधं सोपं समजू नका. हे इतक्या नीच पातळीचे लोक आहेत की, यांच्यात कोणातच काहीच बदल होणार नाही. ही टोळी संपवावी लागणार आहे. या राज्यातल्या मराठ्यांना मी सांगतो की, यांना तांब्याभर पाणी सुद्धा देऊ नका. इतकी क्रूर हत्या जर आपल्या घरातल्या लेकराची झाली असती तर तुम्ही कसे वागले असतात? आपल्या लेकराला हालहाल करून मारले. बदला होणार… संतोष भैय्यांचा बदला होणार, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
त्यांना नियती माफ करणार नाही
तर धनंजय देशमुख म्हणाले की, सगळे पाठीमागे उभे आहे. त्यामुळे आपण इथपर्यंत येऊ शकलो. इथून पुढेही जाऊ. त्यांना हीच गोष्ट हवी असेल की हे लोक कमजोर कसे होतील. त्या अर्थाने कदाचित इतके गुन्हे केले असते. मी आता निर्णय घेणार आहे. तो निर्णय कितीही कठोर असू द्या, सर्वांना विचारात घेऊन मी निर्णय घेणार आहे. हे फोटो लोकांनी आधीच बघितलेले आहेत. गृहमंत्रालयाकडे देखील हे फोटो गेलेले असणार, असा आरोप त्यांनी केला. इतक्या खालच्या स्तराची विचारसरणी घेऊन हे लोक चालले आहेत, हे अत्यंत निंदनीय आहे. त्यांना नियती माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले.
आरोपीचं समर्थन करणारी टोळी – धनंजय देशमुख
अडीच महिन्यात जिल्ह्याचे, गावाचे, समाजाचे नुकसान झालंय ते कोण भरून देणार, ज्या गोष्टी चुकीच्या घडल्यात त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे असं सांगत आरोपीचं समर्थन करणारी टोळी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.
पहिल्या २४ तासांतच मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता: संजय राऊत
मुख्यमंत्रई फडणवीस यांनी ही घटना समोर येताच पहिल्या २४ तासांतच मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता. पण ते म्हणत होते कोर्ट ठरवेल. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घेतला असता तर फडणवीस यांनी न्याय केला असे आम्ही छातीठोकपणे सांगू शकलो असतो. परंतू या राज्याचे गृहमंत्रीच कायदा आणि न्यायाची बूज राखत नाहीत. फडणवीस म्हणजे रामशास्त्री नाहीत. ते काही लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. त्याला न्याय म्हणत नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केली.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बीडमधील प्रत्येक बुथवर मतदारांना धमक्या कशा दिल्या गेल्या, दहशत आणि मतदान कसे करू दिले नाही, हे निवडणूक आयोगाने, फडणवीस आणि अमित शाह यांनी देखील पाहिले आहे. त्यांची निवडणूक तेव्हाच रद्द करायला हवी होती. तसे झाले असते तर संतोष देशमुखचे प्राण वाचले असते, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये संतोष देशमुखांना क्रूरपणे मारहाण करण्यात आली, त्यांच्यावर लघवी करण्यात आली. एकीकडे छावा चित्रपटातून औरंगजेबाची क्रुरता दाखविली जात असताना दुसरीकडे त्याच महाराष्ट्रात एका सरपंचावर अशा प्रकारे क्रुरता केली जाते, हे काय आहे, असा सवाल राऊत यांनी केला. यातील सर्व लोक धनंजय मुंडे यांच्याशी संबंधीत आहेत. मुंडे कोणी महात्मा नाहीत. हे मिस्टर फडणवीस यांनाही माहिती आहे. अजित पवारांनाही माहिती आहे, अशी टीका राऊत यांनी केली.