मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीवर , शासन , प्रशासनाची मुक्याची भूमिका , कनिष्ठ अधिकारी स्तरावर मात्र चौकशीचे आदेश !!

अहिल्यानगर: मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा ग्रामपंचायतीने केलेला ठराव धक्कादायक आणि सकृतदर्शनी घटनाबाह्य असल्याचे दिसत असून याबाबत गटविकास अधिकार्यांनी सहायक गटविकास अधिकारी संगिता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. तसेच ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ग्रामसेवक, सरपंच, ठरावाचे सूचक, अनुमोदक आणि ग्रामसभेतील उपस्थित लोकांचे जबाब चौकशी समिती नोंदवणार आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल पाठविला जाईल, असे गटविकास अधिकार्यांकडून सांगण्यात आले आहे.विशेष म्हणजे यावर जिल्हाधिकारी , पोलीस प्रशासन किंवा शासनाकडून अद्याप कुठलेही भाष्य करण्यात आले नाही.
पाथर्डी तालुक्यातील मढी गावातील ग्रामसभेत कानिफनाथ देवस्थानच्या यात्रेत एकही मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना दुकान लावण्यात बंदी घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. या निर्णयानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे. मढीतील मुस्लिम व्यावसायिकांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून मढीतील यात्रा ही शांततेत पार पाडावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, शनिवारी राज्याचे मंत्री नितेश राणे या ठिकाणी भेट देणार आहेत.
सर्वधर्मियांची यात्रा म्हणून ओळख
शुक्रवारपासून मानाची होळी पेटवून मढीच्या कानिफनाथ यात्रेचा शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर मढी गावातील मुस्लिम बांधवांनी आणि व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी शाहूराव मोरे यांना निवेदन दिले. मढी यात्रा सर्व धर्मींची एकतेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. अठरापगड जातीच्या, सर्व धर्मीयांची होळी म्हणून आजपर्यंत गडावर होळी पेटवली जात होती. हिंदूंसह मुस्लिम बांधव या होळीसाठी शेणाची गोवरी देत असतात. हा सण सर्व धर्मीय मिळून साजरा करावा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती मढी गावाचे ग्रामस्थ फिरोज शेख यांनी दिली.
शनिवारी मढी येथे राज्याचे मंत्री नितेश राणे हे येणार आहेत. या दरम्यान काही चिथावणीखोर वक्तव्य होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ही यात्रा शांततेत व्हावी यासाठी प्रशासन नेमकी काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदीचा ठराव
या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरपंचांनी याची माहिती दिली. ते म्हणाले की, “या यात्रेमध्ये बहुसंख्य व्यापारी हे मुस्लिम असतात आणि ते आमची परंपरा पाळत नाहीत. यात्रेच्या या काळात महिनाभर देवाला तेल लावलेलं असतं. हा दुखवट्याचा कालावधी असल्याने या काळात आम्ही कोणतेही शुभ कार्य करत नाही, शेतीची कामं करत नाही. तेलात तळलेले पदार्थ खात नाही. गादी आणि खॉटही वापरत नाही. पण गावात आलेले मुस्लिम व्यापारी मात्र ही परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांच्या भावनांना ठेच लागते.”