Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPolitical Update : मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचक प्रतिक्रिया

Spread the love

मुंबई : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय, विरोधकांनी काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा आरोप करत धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासाठी घेरले आहे. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे. सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर मीही राजीनामा दिला होता, राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडेंनी ठरवावं.असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. आता अजित पवारांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे नेमका काय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी सांगितले आहे की, जी घटना बीडला घडली, ती अतिशय निंदनीय आहे. माणुसकीला काळं फासणारी ती घटना आहे. त्यामुळे त्यात जे कोणी दोषी असतील त्यांना शासन केले जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्वरित एसआयटी, सीआयडी नेमली आहे. न्यायालयीन चौकशी देखील सुरू आहे.

सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर मीही राजीनामा दिला होता

अजित पवार पुढे म्हणाले की, एखाद्यावर आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील नाव आले तर आपण कारवाई करणार आहोत. माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, तेव्हा मी राजीनामा दिला होता. कारण माझ्या बुद्धीला ते पटले नाही. मी स्वच्छ पद्धतीने काम केले होते. मी गेल्या 34 वर्षांपासून अनेक खाते सांभाळली आहेत. 1992 सालापासून आजपर्यंत काम करताना मला देखील बदनाम करण्यात आले. माझी जन मानसात प्रतिमा मलीन करण्यात आली. त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटले की आपण इतक्या व्यवस्थितपणे काम करत असताना आरोप होत आहेत. त्यानंतर मी राजीनामा दिला होता. तर काही जणांवर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही नेत्यांनी राजीनामे दिलेले आहेत. मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे. या प्रकरणात आम्ही म्हणतोय की, दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल.

आम्ही अजिबात कोणाला वाचवणार नाही

धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याची नैतिकता का दाखवत नाही? असे विचारले असता हा प्रश्न आपण धनंजय मुंडे यांनाच विचारा, त्यांचं म्हणणं आहे की, यात माझा काही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. आम्ही अजिबात कोणाला वाचवणार नाही. आम्हाला कोणाला वाचवण्याकरता आम्हाला जनतेने 237 आमदार निवडून दिलेले नाहीत. आम्हाला चांगले काम करण्यासाठी निवडून दिलेले आहेत. त्या पद्धतीने आम्ही चांगले काम करणार आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!