MaharashtraPoliticalUpdate : चर्चेतली बातमी : मुंडे – धस भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

जळगाव : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणावरुन गाजत असलेले धनंजय मुंडे आणि हे प्रकरण आक्रमक पद्धतीने मांडणारे आमदार सुरेश धस यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त माध्यमांत झळकल्यानंतर सोशल मीडियातून आणि विरोधकांकडून सुरेश धस यांच्यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही धस यांच्यावर हल्लाबोल करत धस यांनी दगाफटका केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, आमदार धस आणि मंत्री यांच्या भेटीनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत, तर सत्ताधारी आपली बाजू मांडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भेटीने कुठलाही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगावात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की , कोण कुणाला भेटलं याच्यावर राजकारण होत असेल तर ते लोकशाहीमध्ये योग्य नाही, लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे. बीडमधील हत्याप्रकरणात मी खंबीर भूमिका घेतलेली आहे. खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवाद तोडून टाकायचा असं करण्याची आवश्यकता नाही. धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत, एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्याने कुठलाही फरक पडत नाही. सुरेश धस यांनी देखील सांगितले आहे की, भेट घेतली तरी हेतू एकच आहे की सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तोच हेतू घेऊन सुरेश धस काम करत आहेत. मात्र, काही लोकांच्या पोटात दुखते, त्यामुळे ते यावर टीका करतात.
जरांगे पाटील यांची भेटीवर टीका
दरम्यान, वाल्मिक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहेत, ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंडे-धस भेटीवर टीका केली होती. त्यानंतर, सुरेश धस यांनीही सर्वच बाजुंनी होणाऱ्या टीकेवर बोलताना माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं जात असल्याचे म्हटले. मात्र, धस यांच्याविरुद्ध षडयंत्र रचण्याचा विषयच येतो कुठे, तुम्ही भेटायला गेले आता सपादनी करू नका, अशा शब्दात मनोज जरांगे यांनीही सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. तसेच, तुम्ही मराठ्यांची जी फसवणूक करायची नव्हती ती केली, गोड बोलून तुम्ही मराठ्यांचे मुंडके मोडून टाकले, ही अपेक्षा नव्हती, असेही पाटील यांनी म्हटले.