मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाबाबत मोठा निर्णय , पाचव्या दिवशी प्रकृती खालावली….

जालना : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ते उद्या दुपारी उपोषण सोडणार आहेत. २५ जानेवारीपासून ते उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे मंगळवारी रात्री त्यांना सलाईन लावण्यात आलं. अंतरवाली सराटीत सुरु असलेलं उपोषण थांबवण्याचा निर्णय जरांगेंनी घेतलेला आहे. बीडच्या केजमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण तापलेलं आहे. त्यावरुन लक्ष हटू नये म्हणून उपोषण सोडत असल्याचा निर्णय जरांगेंनी घेतला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत २५ जानेवारीला उपोषण सुरु केलं. ते सातव्यांदा उपोषणाला बसले होते. पण आता त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आम्ही आज, उद्या निर्णय करुन उपोषण थांबवणार आहोत. कारण संतोष भय्या देशमुखांच्या हत्येचं प्रकरण मागे पडायला नको. आम्हाला तिकडेही बघायचं आहे. संतोष देशमुख, त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा विचार करुन आम्ही आंदोलन थांबवत आहोत,’ असं जरांगे म्हणाले.
‘मागील पावणे दोन वर्षे आम्ही उपोषणं केली. आता मी वेगळ्या मार्गानं आंदोलन करणार आहे. मी आता उपोषण करणार नाही. पण आता झक पक आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी १२ वाजता उपोषण सोडण्याबद्दल मराठा समाजासी बोलून निर्णय घेणार आहे. आज रात्री किंवा सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार,’ अशी महत्त्वपूर्ण घोषणा जरांगे यांनी केली.
मराठा समाजाचे डोळे उघडले आहेत. आरक्षणाचे खरे मारेकरी कोण हे सर्वांना माहीत झालं आहे. देवेंद्र फडणवीस जाणूनबुजून काम करत नाहीत, ही बाब मराठा समाजाला समजली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. धनंजय देशमुख यांच्याशी मी सकाळी बोललो आहे. हत्येचं प्रकरण मी मागे पडू देणार नाही, असं मी धनंजय देशमुखांना सांगितलं आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.