पुण्यातील गुन्हेगारी थांबेना , सतीश वाघ खून प्रकरणाने खळबळ , उलगडले हत्या आणि अपहराणाचे कारण !!

पुणे: भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येनं संपूर्ण पुणे शहर हादरलं होतं. सोमवारी सकाळी चार अज्ञातांनी वाघ यांचं अपहरण केलं होतं. अपहरणानंतर काही तासांतच उरळी कांचन परिसरातील घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला होता. वाघ यांची हत्या कुणी केली आणि कोणत्या कारणातून केली, याचा उलगडा होत नव्हता. अखेर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला असून चार आरोपींना अटक केली आहे. वाघ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. याबाबतचा खुलासा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे.
सतीश वाघ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने वैयक्तिक कारणातून ही हत्या केल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली. त्यासाठी आरोपीनं इतर चार जणांना ५ लाखांची सुपारी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये सुपारी देणाऱ्या व्यक्तीचा देखील समावेश आहे. हत्येच्या वेळी कारमध्ये असलेला एक आरोपी मात्र अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सतीश वाघ हत्याप्रकरणी अधिक माहिती देताना अमितेश कुमार यांनी सांगितलं, सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात एकूण पाच आरोपी आहेत. आतापर्यंत पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे. वैयक्तीक कारणातून घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं सुपारी देऊन हत्या केली आहे. ज्याने सुपारी दिली त्यालाही अटक केली आहे. हत्येच्या वेळी गाडीत असलेला एक आरोपी फरार आहे, पोलीस योग्यप्रकारे तपास करत आहेत, लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावला जाईल. मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही फुटेज तपासले जातायत. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या गाडीला ट्रेस करून हत्येचा उलगडा केला आहे.