Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharaashtraPoliticalUpdate : राजभवनवर जावून फडणवीस , शिंदे, पवारांनी सत्ता स्थापनेचा केला दावा , आता तयारी शपथविधीची ….

Spread the love

मुंबई : विधीमंडळाच्या गट नेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीस यांनी मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार यांना सोबत घेऊन राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. अखेर उद्या मुंबईतल्या आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यापूर्वी महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आला असून उद्या फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्याान भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नीवड झाल्यानंतर महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक वर्षावर पार पडली. या बैठकीनंतर आता राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. संख्याबळासाठी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यापालांना देण्यात आलं आहे. देवेंद्र फडणीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

उद्या शपथविधी

उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल 22 राज्यातील मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल चाळीस हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान महायुतीच्या नव्या सरकारामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा जुनाच पॅटर्न कायम राहणार आहेत. उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत. मात्र त्यांच्यासोबत आणखी कोण -कोण मंत्रिपदाची शपथ घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिंदे आणि फडणवीस हे एकाच कारमधून राजभवनावर…

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्याने आज राज्यपालांच्या भेटीला देवेंद्र फडणवीसांसोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नुकतेच तिन्ही पक्षांचे नेते राजभवनावर पोहोचले आहेत. शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी फडणवीस आणि अजित पवार गेले होते. यानंतर तिन्ही नेते राजभवनावर पोहोचले व सत्तास्थापनेचा दावा केला.

शिंदे आणि फडणवीस हे एकाच कारमधून राजभवनावर पोहोचले आहेत. या कारमध्ये गिरीष महाजनही होते. तर अजित पवार हे त्यांच्या कारमधून आले, अजित पवारांसोबत धनंजय मुंडे कारमध्ये होते. भाजपाचे अन्य काही आमदारही राजभवनावर पोहोचले. यानंतर थोड्याच वेळात या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला.

शपथविधी सोहळा कुठे?

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी जय्यत तयारीही सुरु आहे. आझाद मैदानात 30 हजारपेक्षा जास्त नागरिक बसतील एवढा मोठा मंडप बांधला जात आहे. तसेच आझाद मैदानावर 100 बाय 100 चं मुख्य स्टेज उभारण्यात येत आहे. त्याच्या बाजूला दोन स्टेज बांधण्यात येत आहे. हा संपूर्ण स्टेज आणि मंडप भगव्या रंगाचे असणार आहे. या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि देशातील सर्वच राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

शपथविधी सोहळा किती वाजता?

महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला उद्या संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतील. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळेमुळे कार्यक्रमाचं स्वरूप संक्षिप्त करण्यात आलं आहे. तर इतर मंत्र्यांचा शपथविधीदेखील लवकरच पार पडेल. मुंबईतील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!