MaharshtraPoliticalUpdate : चर्चेतली बातमी : आएएनएस आणि मॅट्रिझच्या ओपिनियन पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचाच डंका !!
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीबरोबरच मनसे, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी या छोट्या पक्षांसह शेकडो अपक्ष रिंगणात उतरल्याने विधानसभा निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य मतदार आणि राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे. मात्र अद्याप राज्यातील निवडणुकीचा कल दर्शवणारे आकडे समोर आले नव्हते. दरम्यान, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आएएनएस आणि मॅट्रिझच्या ओपिनियन पोलमधून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचाच डंका वाजणार आसाला तरी मराठवाड्यात महायुतीची पीछेहाट होईल असे चित्र समोर आले आहे.
आज चर्चेत आलेल्या आएएनएस आणि मॅट्रिझच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला महाराष्ट्रामध्ये १४५ ते १६५ जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला विरोधी पक्षात बसावे लागण्याची शक्यता ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आली आहे. या ओपिनियन पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यात १०६ ते १२६ जागा मिळू शकतात. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास महायुतीली ४७ टक्के तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मतं मिळलीत. इतर छोट्या पक्षांना १२ टक्के मतं मिळू शकतात. मात्र महाराष्ट्रातील सर्व छोटे पक्ष आणि अपक्षांना केवळ ५ च्या आसपास जागा मिळतील, असाही दावा या सर्व्हेमध्ये केला आहे. मात्र, राज्यात कोणाला किती जागा मिळणार आणि कुणाचे सरकार येणार? याचे चित्र 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.
या ओपिनियन पोलमधून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा विभागवार अंदाजही जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला ३१ ते ३८ जागा, तर महाविकास आघाडीला २९ ते ३२ जागा मिळू शकतात. विदर्भात महायुतीला ३२ ते ३७ जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला २१ ते २६ जागांवर समाधान मानावं लाहू शकतं मराठवाड्यात महायुतीला १८ ते २४ जागा, तर महाविकास आघाडीला २० ते २४ जागा मिळण्याची शक्यता आहे.
कोकणात महायुतीला २३ ते २५ तर महाविकास आघाडीला १० ते ११ जागा मिळू शकतात. मुंबईत महायुतीला २१ ते २६ आणि महाविकास आघाडीला १६ ते १९ जागा मिळू शकतात. उत्तर महाराष्ट्रात १४ ते १६ जागांवर महायुती विजयी होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १६ ते १९ जागा मिळू शकतात, असे या पोलमध्ये म्हटले आहे.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे आले असता त्यांना या सर्व्हेबाबत विचारण्यात आले. यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही आमचं काम करतोय. आम्ही राहिलेल्या दिवसात लोकांपर्यंत पोहोचणे आणि 175 पर्यंत जागा मिळवणे हा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे
काय म्हणाले संजय राऊत ?
संजय राऊत म्हणाले की, सर्व्हे कोणाचे येत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती नाही. लोकसभेला सर्व्हे आले होते. महाविकास आघाडीला दहा जागा मिळणार नाही. पण, आम्ही 31 जागा जिंकलो. आता कुठून कुठून काय सर्व्हे करतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील हे सांगता येत नाही. महाराष्ट्रातील मतदार जागृत आहेत. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळत आहेत. आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. पैशाचे वाटप, ईव्हीएमचा विषय हरियाणाच्या निवडणुकीत आला होता. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा आताचे सरकार येणार नाही. मोदी-शाह यांच्या कृपेने बसलेले हे सरकार पुन्हा निवडून येणार नाही, याची आम्हाला खात्री आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
