महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे , मविआने संभाजीनगर नामकरणाला विरोध केला : अमित शाह
सांगली : ‘काँग्रेसचे अध्यक्षच सांगतात काँग्रेस जी आश्वासनं देतं ती काल्पनिक आहेत, ती कधीच पूर्ण होणार नाहीत. पण मी आज तुम्हाला सांगतो, मोदींनी जी आश्वासने दिलीत ती आम्ही पूर्ण केली आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला तर काँग्रेसमध्ये डझनभर नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर केला. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज शिराळा येथे जाहीर सभा घेतली. यावेळी शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम राहणार की मुख्यमंत्री बदलले जाणार, याची चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ट संकेत दिले. महायुतीला विजयी करा, फडणवीसांना विजयी करा असे अमित शहा यांनी म्हटले. विशेष म्हणजे शहा यांची प्रचार सभा ही भाजप उमेदवारांसाठी होती. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
शिराळा येथील सभेत बोलताना अमित शाह म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र नंबर वन होऊ शकतो. मी मागील महिन्यात महाराष्ट्रातील प्रत्येक भागात फिरलो, त्या सगळीकडे एकच चर्चा आहे, महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे आहे, केंद्रात भाजपाचे सरकार आहे, राज्यात महायुतीचे सरकार बनवा. हे दोन्ही सरकार महाराष्ट्राला नंबर एकचे राज्य बनवायचे काम करतील, असंही अमित शाह म्हणाले.
“औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हायला पाहिजे, पण आघाडीवाले याला विरोध करत आहेत. उद्धव ठाकरेंचा याला विरोध आहे, शरद पवार तुम्ही कितीही जोर लावा आम्ही औरंगाबादला संभाजीनगर हे नाव देणारच, असा टोलाही शाह यांनी शरद पवार यांना लगावला. जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा आणण्याचा यांचा प्रयत्न आहे, पण आम्ही तो पुन्हा येऊ देणार नाही. काही दिवसापूर्वी मोदींनी वक्फ बोर्डाचे विधेयक आणले या विधेयकालाही या लोकांनी विरोध केला. आघाडीचे सरकार जर सत्तेत आले तर शेतकऱ्यांची जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर होईल. आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीला हात लावू देणार नाही, असंही शाह म्हणाले.
शरद पवार यांच्यावर साधला निशाणा
अमित शाह म्हणाले, आम्ही अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी आम्ही शरद पवार आणि राहुल गांधींना बोलावले पण त्यांनी पुन्हा अयोध्येत येईन असं सांगितलं. पण अजूनही ते अयोध्येला गेलेले नाही, त्यांना त्यांच्या व्होट बँकेचे भीती वाटते म्हणून ते अजूनही अयोध्येला गेलेले नाही, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला.
या सभेत बोलताना शहा यांनी शिराळा येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आज अमित शहा यांची सभा पार पडली. सांगलीतील शिराळा येथील सभेत बोलताना अमित शहा यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचाार सभेत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. आघाडीच्या सरकारने शिराळामध्ये बंद केलेली नागपूजा महायुतीचे सरकार सुरू करेल असे आश्वासनही त्यांनी दिले. बत्तीस शिराळाची नागपंचमी पारंपरिक आणि पहिल्यासारखीच होणार आणि कायद्याच्या पालन करत नागपंचमी सुरू होईल अशी घोषणा अमित शहा यांनी केली.
पवारांच्या चार पिढ्या आल्या तरी…
अमित शहा यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मोदींच्या सरकारने काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केले. मात्र, हे संविधानातील हे कलम पुन्हा लागू व्हावे यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांची मागणी आहे. शरद पवारांच्या चार पिढ्या आल्या तरी काश्मीरसाठी असलेले कलम 370 पुन्हा लागू होणार नाही असे शहा यांनी सांगितले. प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्येत साकार झाले. पण, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी रामल्लाचे दर्शन घेतले नाही. आपल्या व्होटबँकेसाठी त्यांनी अयोध्येला जाणं टाळलं असल्याचा आरोपही शहा यांनी केला.