Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : उद्धव ठाकरेंचे ठरले !! कोकणातून 5 नोव्हेंबरपासून प्रचाराचा शुभारंभ….

Spread the love

मुंबई : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर सर्वच पक्षांनी आपल्या प्रचाराचे नियोजन केले आहे. या नियोजनाचा भाग म्हणून शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून पहिलीच सभा रत्नागिरी येथून म्हणजेच कोकणातून होणार आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, लोकसभा निवडणुकीत येथील मतदारसंघात महायुतीचा उमेदवार विजयी झाला आहे. कोकणातील दोन्ही मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे आता विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. त्यामुळेच, ते रत्नागिरी जिल्ह्यातून आपल्या निवडणूक प्रचारसभांची सुरूवात करत आहेत.

शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रचारसभांसाठीचा नियोजित दौरा आखण्यात आला असून 5 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर असा दौरा आहे. या दौऱ्याची सुरुवात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातून होणार असून 17नोव्हेंबर रोजी मुंबईत सांगता सभा होणा आहे. तर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात 16 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे सभा घेऊन जनतेला संबोधित करतील. उद्धव ठाकरे यांच्या या काळात 20 ते 25 जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवेनेतील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. त्यामध्ये मविआच्या संयुक्त सभांचा देखील समावेश असणार आहे. तर, दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या देखील सभा होणार आहेत. त्यामध्ये, संजय राऊत, सुषमा अंधारे याही विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभांमधून आपली तोफ धडाडणार आहेत. त्यामुळे, दिवाळीनंतरच खरे राजकीय फटाके फुटणार आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आता 288 मतदारसंघातील लढती निश्चित झाल्या असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. त्यामुळे, या लढाईत सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपलं सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरले आहेत. त्यामध्ये, राज्यातील ठाकरे, पवार, फडणवीस, शिंदे आणि काँग्रेसमधील दिग्गज नेते स्वत: निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. यंदा प्रथमच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हेही माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी, सर्वच बड्या नेत्यांकडून प्रचारासाठी रणनीती आखली जात आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याही महाराष्ट्रात 10 ते 15 सभा होणार असल्याची माहिती आहे. दिवाळीनंतरच म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील प्रचारसभेत नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील प्रमुख मतदारसंघात सभा घेतील. यांसह, भाजपकडून 40 स्टारप्रचारकांची यादाही जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, केंद्रीयमंत्र्यांचाही समावेश आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!