MaharashtraElectionUpdate : महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी दाखल केले 8 हजार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज….

मुंबई : महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी सुमारे 8 हजार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी (२९ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 7,995 उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे 10,905 उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली, ती 29 ऑक्टोबरला संपली. उमेदवारी अर्जांची पडताळणी आणि छाननी 30 ऑक्टोबर रोजी होणार असून 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 148 जागांवर निवडणूक लढवत आहे.
काँग्रेस किती जागांवर निवडणूक लढवणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 80 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 53 उमेदवारांना तिकीट दिले आहे. महायुतीच्या इतर मित्रपक्षांना पाच जागा देण्यात आल्या आहेत, तर दोन जागांवर निर्णय झाला नाही. तर विरोधी महाविकास आघाडीत काँग्रेस 103 जागांवर निवडणूक लढवत आहे.
https://x.com/AkbarOwaisi_MIM/status/1851314851232309623?
ओवेसींचा पक्ष 14 जागांवर निवडणूक लढवणार….
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) 89 जागांवर आणि राष्ट्रवादी (SP) 87 जागांवर निवडणूक लढवत आहे. सहा जागा इतर एमव्हीए मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत, तर तीन विधानसभा जागांवर स्पष्टता नाही. यासह असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 14 उमेदवारांना तिकीट दिले आहे.
किती विद्यमान आमदारांची तिकिटे कापली?
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द केली आहेत. सत्ताधारी भाजपने आपल्या आठ विद्यमान आमदारांना तिकीट दिले नाही. त्याचवेळी काँग्रेसने पाच विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द केली.
अजित पवार आणि शरद पवार यांनी यावेळी त्यांच्या पक्षाच्या दोन विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दोन वगळता जवळपास सर्वच आमदारांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे.