MaharashtraPoliticalNewsUpdate : वंचित बहुजन आघाडीची ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर , तृतीयपंथी शमिभा पाटील यांनाही उमेदवारी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करून टाकली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत वंचितने ११ उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीतील मतदारसंघांमध्ये रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली, नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव, खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. घोषित केलेले सर्व उमेदवार विदर्भ-मराठवाड्यातील आहे. यामध्ये भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
असे आहेत घोषित उमेदवार
१. रावेर – शमिभा पाटील
२. सिंदखेड राजा – सविता मुंढे
३. वाशिम- मेघा किरण डोंगरे
४. धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
५. नागपूर दक्षिण पश्चिम – विनय भांगे
६. साकोली – डॉ. अविनाश नन्हे
७. नांदेड दक्षिण- फारुक अहमद
८. लोहा – शिवा नरंगले
९. छत्रपती संभाजीनगर पूर्व – विकास दांडगे
१०. शेवगाव – किसन चव्हाण
११. खानापूर – संग्राम माने
दरम्यान, “आमच्यावर काहीही आरोप होत असले तरी आम्ही राज्यात सध्या सर्वच प्रमुख पक्षांचं सुरू असलेलं एकजातीय राजकारण मोडून काढण्यासाठी विविध समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे,” असं या पत्रकार परिषदे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, वेगवेगळ्या ओबीसी संघटना आणि त्याचबरोबर आदिवासी समुहातील राजकीय पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरवण्याचे ठरवले आहे. या आघाडीला अजून आम्ही नाव दिलेलं नाही, पुढे नाव देणार आहोत. काही जणांशी आम्ही बोलतोय, सोबतच काही संघटनांशी बोलतोय . लोकसभा निवडणुकीत आम्ही पाहिलं आहे, पैशाचा महापूर होता. आता महापुराचा महापूर येईल विधानसभेत असं आम्हाला वाटतं. त्यामुळे उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादी जाहीर करतोय , असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ऑक्टोबर 12 पर्यंत निवडणुकीचे नोटिफिकेशन निघेल असं गृहित धरुन चाललो आहे. 15 नोव्हेंबरला मतदान कुठल्याही परिस्थितीत मतदान घ्यावं लागेल आणि निकाल जाहीर करत शपथविधी कार्यक्रम घ्यावं लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
कोण आहेत शमिभा पाटील ?
श्याम मीना भानुदास पाटील यांनी आता शमिभा हे नाव धारण केलं आहे. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच, वंचित बहुजन आघाडीच्या सक्रीय पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. राज्यातील तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक आणि मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी वयाच्या 30 व्या वर्षी लैंगिक ओळख सार्वजनिक केली होती. त्यानंतर, जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीय समुदायाला एकत्र करण्याचं काम त्यांनी त्यांनी केलं असून आजही ते सुरू आहे. तृतीयपंथीयांचे शिक्षणाचे प्रमाण केवळ 0.3 टक्के आहे, त्यामुळे, तृतीयपंथीयांच्या शिक्षण हक्कासाठी त्या लढत आहेत. महाविद्यालयीन नाटकांमध्येही शमिभा यांनी स्त्री पात्राची भारदस्त भूमिका साकारल्या होत्या. शमिभा या सामाजिक कार्यात अग्रेसर असतानाही शिक्षणाप्रती अतिशय संवेदनशील आहेत. म्हणूनच पीएचडीसारखी सर्वात मोठी पदवी मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ कवी ग्रेस यांचे साहित्य हा विषय घेऊन त्या पीएचडी करत आहेत.