MaharashtraPoliticalNewsUpdate : विधान परिषदेत महायुतीला 9 तर महाविकास आघाडीला 2 जागा , जयंत पाटलांचा पराभव , नार्वेकर विजयी…

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी संध्याकाळी जाहीर झाला. या निवडणुकीत ठरल्याप्रमाणे महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले आणि भाजपने सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र या निवडणुकीचे विशेष म्हणजे ठाकरे गटाने शेवटच्या क्षणी 12 वा उमेदवार म्हणून उभे केलेले मिलिंद नार्वेकर अत्यंत चुरशीच्या लढतीत विजयी झाले. शरद पवार यांनी पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना मात्र पराभव सहन करावा लागला. या निवडणुकीत शिंदे गट आणि अजितदादा गटाच्या आमदारांची मते फुटतील अशी चर्चा होती मात्र तसे झाले नाही.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उभे होते. त्यामुळे, कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यामध्ये, भाजपकडे संख्याबळ असल्याने भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास भाजप नेत्यांना होता. तर, महायुती म्हणूनही आमचे सर्वच ९ उमेदवार जिंकतील, असा दावाही भाजपच्या नेत्यांकडून केला जात होता. भाजपसह महायुतीच्या नेत्यांनाही या विजयाचा विश्वास होता. त्यानुसार, महायुतीच्या सर्वच 9 उमेदवारांचा विजय झाला आहे. तर, महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे.
काँग्रेसची एकूण 8 मते फुटली….
दरम्यान विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेसची मते फुटणार, अशी चर्चा होती. या निवडणुकीत अजित पवार गटाला दोन उमेदवार निवडून आणणे कठीण होते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची गरज होती. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी पहिल्या पसंतीची 23 मते मिळवत विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसची 8 मते फुटल्याची चर्चा आहे.
विधानपरिषदेच्या 11 विजयी उमेदवारांची यादी
भाजपचे विजयी उमदेवार : 1.योगेश टिळेकर , 2.पंकजा मुंडे , 3.परिणय फुके, 4.अमित गोरखे , 5.सदाभाऊ खोत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार : 6.भावना गवळी, 7.कृपाल तुमाने , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार : 8.राजेश विटेकर , 9.शिवाजीराव गर्जे
काँग्रेस विजयी उमेदवार : 10.प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गट : 11.मिलिंद नार्वेकर
शरद पवार गट आणि ठाकरे गटाला अपयश
या निवडणुकीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून महायुतीची मते फोडण्याचा प्रयत्न होता ज्याचा फटका अजित पवार गटाच्या उमेदवारांना बसणार अशी चर्चा होती. मात्र, शरद पवार गटाला अजितदादा गटाचे एकही मत फोडण्यात यश आले नाही. तर उद्धव ठाकरे यांनाही शिंदे गटाची मते फोडण्यात अपयश आले. यामुळे मविआचे तिसरे उमेदवार असणाऱ्या जयंत पाटील यांचा पराभव झाला.
जातीय समीकरण
या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे एकूण पाच उमेदवार विजयी झाले आहेत. या निमित्ताने भाजपने अमित गोरखेंच्या रूपाने मातंग समाजाला . तर योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळाले आहे. याशिवाय, सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार झाला आहे.