उत्तराखंडच्या उत्तरकाशीत वाट चुकले आणि ५ गिर्यारोहक जीवनाला मुकले , महाराष्ट्रातील एका महिलेचा सामावेश

उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील २२ जणांच्या ग्रुपपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून चौघे अद्याप बेपत्ता आहेत. तर १३ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. खराब हवामानामुळे वाट चुकल्यानंतर पाच गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. २२ जणांच्या ग्रुपमध्ये कर्नाटकमधील १८ तर महाराष्ट्रातील एक महिला आहे. त्यांच्यासोबत तीन शेर्पा होते.
उत्तरकाशीतील कुशलकल्याण सहस्रताल या हिमालयातील उंच ठिकाणी गिर्यारोहण करण्यासाठी २२ जणांचा ग्रुप गेला होता. याबाबतची माहिती समजताच भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टरने बुधवारी मदतकार्य केले. यात पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले. अद्याप अडकलेल्या चार जणांचा शोध सुरू असल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली. मणेरी येथील २२ जणांचा गिर्यारोहकांचा ग्रुप २९ मे रोजी उत्तरकाशीपासून ३५ किमीवर असलेल्या ट्रेकसाठी गेला होता.
बचावकार्यात बाहेर काढण्यात आलेल्या गिर्यारोहकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हे गिर्यारोहक अडकले होते ते ठिकाण ४१०० ते ४४०० मीटर उंच आहे. या गिर्यारोहकांचा ग्रुप ७ जूनला परतणार होता. पण त्याआधीच बेस कॅम्पपासून सहस्रताल येथे जाताना हे गिर्यारोहक रस्ता चुकले.
ट्रेक आयोजित करणाऱ्या संस्थेने २२ जणांच्या ग्रुपपैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय. तर इतर लोक अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी बचावकार्य राबवण्यात येत असल्याचं सांगितलंय. यासाठी भारतीय हवाई दलाला उत्तराखंड प्रशासनाने मदतीसाठी विनंती केली होती. या बचावकार्यात वनखात्याचे पथक आणि एसडीआरएफचे जवान कार्यरत आहेत.