AccidentNewsUpdate : बस – जीपच्या धडकेत ५ ठार १५ जखमी

सांगली: सांगली जिल्ह्यातील जत मार्गावर क्रुझर आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर झाली आहे. या अपघातामध्ये 5 जण जागीच ठार झाले आहेत. तर 14 ते 15 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विजयपूर-गुहागर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील जतवरुन येणाऱ्या जत-मुंबई लक्झरी बसला क्रुझर जीपने धडक दिली. या जीपमधून लग्नाचे वऱ्हाड प्रवास करत होते. या जीपमध्ये 14 ते 15 जण होते. त्यामुळे ही जीप खच्चून भरली होती. जत मार्गावरुन जात असताना चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि ही जीप लक्झरी बसला जाऊन धडकली.
ही धडक इतकी भीषण होती की, क्रुझर जीपच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे चालकासहित पुढच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित लोक गंभीररित्या जखमी झाले. या सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. क्रुझरमधील सर्वजण सावर्डेकडे लग्नसमारंभासाठी जात होते. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.