Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UPSCNewsUpdate : लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर , महाराष्ट्रातील तरुणांनीही मारली बाजी …

Spread the love

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी परीक्षेचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर झाला असून त्यामध्ये, महाराष्ट्रातील युवकांनीही बाजी मारली आहे. या परीक्षेत उत्तर प्रदेशच्या आदित्य श्रीवास्तवने देशात पहिला क्रमांक मिळवला असला तरी राज्यातील ४ युवकांनी पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवलं आहे. महाराष्ट्रातून कुश मोटवानी याने ११ वी रँक मिळवली असून समीर खोडे देशात ४२ वा आहे. नेहा राजपूत ५१ तर अनिकेत हिरडेने ८१ वी रँक घेऊन केंद्रात मराठी पताका फडकवला आहे. त्यापैकी, समीर खोडे हा दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेतही झळकला होता.

समीरने युपीएससी परीक्षेतही देशात ४२ वा क्रमांक पटकावत आयएएस अधिकारी होण्याचा सन्मान उत्तीर्ण केला आहे. नागपूर येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर समीरने व्हीएनआयटी कॉलेजमध्ये केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर आयआयएम लखनौ येथे एमबीए पूर्ण करुन काही वर्षे परदेशातील खासगी कंपनीतही काम केले. मात्र, विदेशातील मोठ्या पगाराच्या नोकरीतही समीरचं मन रमले नाही. त्यामुळे, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्याने देशवापसी केली अन् युपीएससी परीक्षेतून सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. समीरने २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षेत ५५१ वी रँक मिळवून भारतीय रेल्वे सेवेत नोकरी मिळवली होती. आता, पुन्हा २०२३ मध्ये घवघवीत यश मिळवून समीर खोडे आता आयएएस होणार आहेत.

कुश मोटवानी राज्यात पहिला, समीर खोडे दुसरा

केंद्रीय नागरी लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेत देशातील एकूण १०१६ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील ८७ हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास ८.६ टक्के महाराष्ट्रातून आहेत. मुंबईचा कुश मोटवानी देशातील ११ व्या रँकसह महाराष्ट्रात पहिला असून समीर प्रकाश खोडे दुसरा आहे, देशात त्यांनी ४२ वा क्रमांक पटकाविला आहे.

३७ दिव्यांग उमेदवारांनीही पटकावले यश

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२३-२०२४दरम्यान घेण्यात आलेल्या परिक्षेत एकूण १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यामध्ये, ३७ दिव्यांग उमेदवारांचा देखील समावेश आहे. यात खुल्या (ओपन) प्रवर्गातून ३४७, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) ११५, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) ३०३, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) १६५, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ८६ उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये ३७ दिव्यांग उमेदवार आहेत.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!