LoksabhaNewsUpdate : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना मिळाले प्रेशर कुकर तर परभणीत पंजाब डंख यांना रोड रोलर …

मुंबई : राज्यातल्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी आज चिन्हांचं वाटप झालं असून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये प्रेशर कुकर या चिन्हावर लढावं लागणार आहे. तर परभणीमधून महायुतीच्या पाठिंब्यावर लढणारे रासपचे नेते महादेव जानकरांना शिट्टी हे चिन्ह मिळालं आहे. अकोल्यात वंचित, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिहेरी लढत होणार आहे. या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांची लढत ही भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्याशी होणार आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे जानकर हे आता महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार बंडू जाधव यांच्या मशालीला टक्कर देणार आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून उभे असलेले हवामान अभ्यासक पंजाब डक यांना रोड रोलर हे चिन्ह मिळालं आहे. परभणीत एकूण ३४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यातील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आलमगीर खान यांनाच राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह असलेले हत्ती तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून कॉ. राजन क्षीरसागर यांना विळा-भोपळा हे त्यांच्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळाले आहे.
अमरावतीत आनंदराज आंबेडकर मैदानात
अमरावती लोकसभा निवडणुकीत ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शेवटच्या दिवशी एकूण १९उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अमरावतीत भाजप उमेदवार नवनीत राणा, मविआचे उमेदवार बळवंत वानखडे, प्रहारचे उमेदवार दिनेश बुब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्यात लढत होणार आहे. २६ एप्रिल रोजी अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.