ShivsenaNewsupdate : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा , दोन जागांवरून काँग्रेस नेत्यांची नाराजी ….

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेनी 17 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. त्यापैकी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.’ मात्र हि यादी जाहीर होताच सांगली आणि दक्षिण मुंबईच्या जागेवरून काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 16 जणांची नावं असलेली यादी आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची वेगळी घोषणा यावेळी करण्यात आली.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्रात एकूण 22 जागांवार लोकसभा निवडणूक लढणार आहे. उरलेल्या 5 जागा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. पालघर, कल्याण, उत्तर मुंबई यासारख्या जागांचा त्यात समावेश आहे. तर हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी पाठिंबा मागतायत. सध्या ती जागा शिवसेनेकडे आहे त्याबाबत लवकरच निर्णय होईल.
दरम्यान काँग्रेसकडून सांगलीसाठी उमेदवार जाहीर केला जाईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधी म्हटलं होतं. पण तिथून ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय ठाण्यातून राजन विचारे, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, परभणीतून संजय जाधव, उस्मानाबाद (धाराशिव)मधून ओमराजे निंबाळकर, सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत या खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच मुंबईतील दोन जागांवरही काँग्रेसने दावा केला होता. पण तिथेही ठाकरे गटाने अमोल किर्तीकर आणि अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
औरंगाबाद येथून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना संधी देण्यात आली आहे. नाशिकमधून राजाभाऊ वाजे, रायगडमधून अनंत गीते आणि हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळमधून संजय देशमुख आणि मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिली आहे.