MaharashtraPoliticalUpdate : वंचित च्या इंडिया आघाडी समावेशाबद्दल शरद पवार यांनी दिली माहिती , आज वंचितची नागपुरात महत्वाची बैठक…

पुणे : इंडिया आघाडीच्या बैठकीत मी स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितले आहे की, प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेतले पाहिजे” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पवार यांनी आज पुण्यातील भीमथडी यात्रेला हजेरी लावली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांनी विविध विषयावर भाष्य केले. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळणार की नाही याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला तेंव्हा त्यांनी हे उत्तर दिले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीची एकूण भूमिका बघता नागपुरात आपल्या पक्षाचा निर्णय घेण्याबाबत २६ डिसेंबर रोजी उद्या नागपुरात बैठक बोलावली आली यावर आपली प्रतिक्रिया काय ? असे विचारले असता शरद पवार म्हणाले, “प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे.पण इंडिया आघाडीच्या बैठकीत मी स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितले की, प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेतले पाहिजे”
वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेत नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. अद्यापही इंडिया आघाडीत वंचितला सहभागी करून घेण्यासंदर्भात कुठली भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस घेत नसल्याचे किंवा कळवत नसल्याचे वंचित बहुजन आघाडीकडून सांगितले जात असून आम्ही अजूनही इंडिया आघाडीकडून आम्हाला सोबत घेतले जाईल अशी अपेक्षा करत आहोत असेही वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात येत होते. मात्र इंडिया आघाडीकडून कुठलीही सकारात्मक प्रतिक्रिया येत नसल्याने वंचित आघाडीने आज २६ डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक बोलावली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी राज्य कमिटीच्या सर्व सदस्यांना या तातडीच्या बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 30 जागांच्या संदर्भात पक्षाकडून निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रकाश आंबेडकर हे आजपासून नागपूर दौऱ्यावर आहेत. भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद झाल्यानंतर उद्या नागपुरात त्यांनी राज्य कमिटीची बैठक बोलवली आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत पत्र व्यवहार, जाहीरपणे सांगून एकत्र येण्याची इच्छा दर्शवली आहे. परंतु, वंचितच्या प्रयत्नांना कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ‘वंचित’ला आता यावर भूमिका घ्यावी लागत आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून इंडिया आघाडीचा भाग बनण्याची इच्छा दर्शवली होती. परंतु, काँग्रेसकडून कुठलीही हालचाल होतांना दिसत नाही. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. मागील २० दिवसांत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची ही दुसरी बैठक आहे. मागील बैठक ५ डिसेंबर रोजी मुंबईत झाली होती. यात लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि रोडमॅप विषयी चर्चा झाली होती.
सुजात आंबेडकर यांची आक्रमक भूमिका
दरम्यान सुजात आंबेडकर यांनी नांदेडमधील कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निर्धार मेळाव्यात इंडिया आघाडीवर तुफान हल्ला चढवताना, तुम्हाला संधी दिली होती पुन्हा रडत येऊ नका.. पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू, असं सुजात आंबेडकर म्हणाले. “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर अजूनही काँग्रेसने अजूनही निर्णय घेतला नाही. त्यावर सुजात आंबेडकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.