JalnaLathichargeUpdate : मोठी बातमी : लाठीचार्जला दोषी धरीत , पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, कोण आहेत तुषार दोशी?

जालना : जालना जिल्ह्यालीत आंतरवाली येथे मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. तसेच या कारवाईमुळे पोलीस, गृह मंत्रालय आणि राज्य सरकारविरोतही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या लाठीमार प्रकरणात प्राथमिकदृष्ट्या दोषी धरून जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली येथे आंदोलन आणि उपोषण करत असलेल्या आंदोलकांना शुक्रवार १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला होता. हा लाठीमार पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याच आदेशावरून झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. तसेच या प्रकरणी कागवाईची मागणीही होत होती. अखेर आज तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
आंतरवाली गावात झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद उमटत असून, मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झाले आहे. ठिकठिकाणी आंदोलकांकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. तसेचा या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
कोण आहेत तुषार दोशी?
तुषार दोशी हे २००१ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस दलात भरती झाले. मी पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिली आणि पोलीस खात्यात भरती झालो, असं तुषार दोषींनी नवी मुंबईत पोलीस उपायुक्तपदी असताना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
तुषार दोशी यांनी फिजिक्समध्ये पदवी घेतली असून पदवीनंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. तुषार दोशी यांचे वडील हे रायगड जिल्हा परिषदेत नोकरी करायचे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तुषार दोशींनी सरकारी नोकरीच करायची असा निश्चय केला. इयत्ता ४ थीपर्यंत तुषार दोशींनी रायगडमध्ये शिक्षण घेतले. यानंतर स्कॉलरशिप मिळवत ते धुळ्यातील सरकारी विद्यानिकेतनमध्ये गेले. ११ वीनंतरचे शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले.
नाशिकमध्ये ट्रेनिंग, चंद्रपूरमध्ये पहिली पोस्टींग. २००१ मध्ये नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तुषार दोशींची पहिली पोस्टींग चंद्रपूरमध्ये करण्यात आली. राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. चंद्रपूरमधील राजुरा नक्षलींचा प्रभाव असलेला भाग होता. गडचिरोलीतील नक्षलवादी या भागात आश्रय घ्यायचे असे तुषार दोशींनी एका मुलाखतीत सांगितले होते. यानंतर लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई या शहरांमध्ये त्यांनी काम केले.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे धडधडीत खोटं बोलत आहेत. पोलीस लाठीचार्ज करीत होते , गोळ्या घालत होते, म्हणूनच मराठा आंदोलक मला वेढा देऊन बसले होते. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केलेला दावा सपशेल खोटा आहे. राज्याच्या गृहमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला इतकं खोटं बोलणं शोभत नाही, भाजपने त्यांना पक्षातून काढून टाकावे, अशी टीका अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांनी केली. यावेळी मनोज जरांगे यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व दावे फेटाळून लावले.
काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला माणूस मरु देता येत नाही. मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे यांना वेढा टाकला होता. पण बाळा, तुमचे पोलीस गोळ्या घालत होते. म्हणूनच आंदोलकांनी मला वेढा टाकला होता. फडणवीस माझ्यावर उपचार करायचे होते, असे म्हणतात. पण गेल्या दोन दिवसांपासून इथे डॉक्टर होते का, हे तुम्ही कोणालाही विचारा. राज्याच्या गृहमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला असलं खोटं बोलणं शोभत नाही. मी तुमचं वक्तव्य ऐकलं नसतं तर बोलण्याची तसदीही घेतली नसती, असे कटू बोल मनोज जरांगे यांनी गृहमंत्र्यांना सुनावले. तसेच जाळपोळ करत असलेल्या लोकांशी मराठा आंदोलनाचा कोणताही संबंध नाही, असा दावाही मनोज जरांगे यांनी केला.
त्यांनी मराठा बांधवांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले. आपल्याला कोणताही उद्रेक करायचा नाही. शांततेच्या मार्गाने आणि लोकशाही मार्गाने आम्हाला पाठबळ द्या. गोंधळ घालणारे कार्यकर्ते आमचे नाहीत. आम्ही या सगळ्याची सखोल माहिती घेतली आहे. आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी हे कुठे गाड्या जाळत आहेत, कुठे रस्ते जाळत आहेत, कोणी धिंगाणा घालत आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि पोलिसांची माया येणाऱ्या गृहमंत्र्यांनी याचा शोध घ्यावा. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.