MaharashtraPoliticalUpdate : शरद पवार – अजित पवार भेटीवरून महाविकास आघाडीत धुसफूस

मुंबई : राज्यात आगामी निवडणूकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. या दरम्यान महाविकास आघाडीत मात्र धुसफूस सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवारांशी गुप्त बैठक केली. या बैठकीवरून मविआमधील घटकपक्ष उद्धव ठाकरे गटाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या भेटीवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्ला चढवला आहे.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व अजित पवार यांची एका उद्योगपतीच्या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मातोश्रीवर आले होते. येथे त्यांची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत परवा झालेल्या दोन नेत्यांच्या बैठकीवर चर्चा झाली. यामुळे महाराष्ट्रात संभ्रमाचं वातावरण तयार होतं आहे याबद्दल देखील या भेटीत चर्चा झाली.
राज ठाकरे
या विषयाच्या अनुषंगाने बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की , सध्याचे वातावरण पाहता महापालिकेच्या निवडणुका लागतील असे वाटत नाही. जो काही आता राजकीय घोळ झालेला आहे, त्यामुळे निवडणुका लावून पायावर कोणी धोंडा पाडून घेणार नाही. आता ज्या लागतील त्या लोकसभेच्याच लागतील. त्या दृष्टीने आमच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात चाचपणी होईल. आमची टीम जाईल आणि हे काम करेल, असे राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की , माझे ऐकत नाही तुम्ही. मी मागेच सांगितलेय की राष्ट्रवादीची ती पहिली टीम आहे, उर्वरित टीमही तिकडे जाणार आहे. हे सर्व आतूनच चालू आहे. हे काही आजचे नाहीय, २०१४ पासून हे लोक एकत्र आलेले आहेत. तुम्हाला पहाटेचा शपथविधी आठवत नाही का, त्यांनतर झालेल्या गोष्टी. शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा ‘चोरडिया’ या नावाच्या ठिकाणी मिळावी हे पण कमाल आहे, असा खोचक टोला राज ठाकरेंनी अजित-शरद पवार गुप्त भेटीवर लगावला.
सध्या दोन दिवसांपूर्वी काय बोलले जाते आणि दोन दिवसांनी काय होते हे काही पत्रकारांना नवीन नाहीय, असे युतीच्या चर्चांवर राज ठाकरेंनी उत्तर दिले. सर्वच बाजुंनी सगळीकडे कन्फ्युजन आहे. हळूहळू हे सर्व दूर होईल. पनवेलला परवा मेळावा आहे, मुंबई गोवा रस्त्याच्या दुरावस्थेवर मी तेव्हाच बोलेन, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
संजय राऊत यांचे टीकास्त्र
या भेटीवर बोलताना खा. संजय राऊत म्हणाले , शरद पवार म्हणाले, अजित पवार पुतणे आहेत. असू शकतात. रोहित पवारांचं वक्तव्य ऐकलं. नातीगोती सांभाळायची असतात, असं रोहित पवार म्हणाले. मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती का लढायचं? हा प्रश्न आहे. उद्या आम्ही जर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चहा प्यायला बसायला लागलो, आम्ही नेत्यांनी त्यांच्याबरोबर बसायचं आणि कार्यकर्त्यांनी मग विचारधारेसाठी एकमेकांविरोधात लढायचं. मला वाटतं शिवसेनेच्या डीएनए मध्ये असं ढोंग नाही. ही लढाई देशाची आणि राज्याची आहे. महाभारताप्रमाणे आहे. मग स्वकीय असतील नातीगोती असतील आम्हाला त्याची पर्वा नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी शरद पवार याना चांगलंच सुनावलं.
लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम येईल असं नेतृत्व निदान भीष्म पितामह यांच्याकडून तरी होऊ नये. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही लढणारे लोकं आहोत. नातीगोती, प्रेम घरामध्ये. आमच्यासमोर आव्हान उभं केलं गेलं आहे. चुकीच्या लोकांशी हातमिळवणी करून कोणी हातमिळवणी करत असेल तर ते आमचे नातेवाईक नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.