MaharshtraRainUpdate : आज मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा

पुणे : कोकणासह, घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरल्यानंतर राज्यातही पावसाची काहीशी उघडीप आहे. आज उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पश्चिम भाग दक्षिणेकडे कायम असून, पूर्व भाग काहीसा उत्तरेकडे आहे.
मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेर, सिकार, ओराई, सुलतानपूर, पाटना, मालदा ते अरुणाचल प्रदेशापर्यंत सक्रिय आहे. पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून केरळ किनारपट्टीपर्यंत कायम आहे. उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.कोकण, घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला आहे. विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. आज तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, उर्वरित कोकणात जोर काहीसा ओसरून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन दिवस मुख्यतः पावसाची उघडीप राहणार आहे. विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. गुरुवारपासून कोकण, घाटमाथ्यावर पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान मध्य महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक, मराठवाड्यात औरंगाबाद , जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, तर विदर्भात बुलडाणा, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली यया जिल्ह्यात विजांसह पाऊस होणार असल्याने यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रातील काही भागातच पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. मात्र, पावसानं चांगलीच दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, राज्यात मुंबईसह उपनगर, ठाणे जिल्ह्यासह कोकणात चांगला पाऊस पडत आहे. तसेच अन्य काही जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुासर महाराष्ट्रात सरासरीच्या २३ टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यातही गंभीर परिस्थिती असून, तिथं सरासरीच्या 38 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळं राज्यात आणखी चांगल्या पावसाची गरज आहे.