Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : बस ४०० फूट खोल दरीत कोसळली , सप्तशृंगी गडावरून येताना झाला भीषण अपघात…

Spread the love

नाशिक : नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात बसला भीषण अपघात झाला आहे. यावेळी बसमध्ये ३५ जण प्रवास करत होते. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाची बुलढाणा येथील खामगाव आगाराची ही बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. जखमी झालेल्या १५ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जणांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे. सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी बसचा अपघात झाला. विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी ८.३० वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेने रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असताना ही बस थेट ४०० फूट दरीत कोसळली. बस क्रमांक MH 40 AQ 6259 वर ड्रायव्हर गजानन टपके, कंडक्टर पुरुषोत्तम टिकार कर्तव्यावर होते. अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असल्याचे खामगाव आगार सहाय्यक कर्मचारी शुभांगी पवार यांनी सांगितले.

अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही : पालकमंत्री दादा भुसे

पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलताना सांगितलं की, “सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधित यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. जी माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील १८ प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉईंटजवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला. अशी प्राथमिक माहिती आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!