NCPCrisesNewsUpdate : बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद नाही करायचा … सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना इशारा …

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर आज पक्षाचे प्रमुख शरद पवार , बंडखोर नेते अजित पवार आणि खा . सुप्रिया सुळे यांनी आपापल्या भाषणात परस्परांचे वस्त्रहरण करण्याची एकही संधी सोडली नाही. इतर नेत्यांच्या भाषणापेक्षा आज महाराष्ट्र या तिघांचीही भाषणे पाहत आणि ऐकत राहिला. नेहमी अजित पवार यांना दादा , दादा म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे अजित पवारच्या भाषणावर आज चांगल्याच आक्रमक झालेल्या दिसल्या . अजित पवारांना उद्देशून त्या म्हणाल्या की , आज एक सांगते, बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी कुणाबद्दलही बोला, आमच्यावर टीका करायची असेल तर कर, पण बापाचा नाद करायचा नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना दिला आहे.
यावेळी आपल्या पहिल्याच रोख ठोक भाषणात , शरद पवारांच्या वयाबद्दल बोलत अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी हे प्रत्युत्तर दिले. वय झाल्याने वडीलधाऱ्या मंडळीना थांबायला सांगणाऱ्या पोरांपेक्षा, आम्ही पोरी बऱ्या, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना सुनावले. वांद्रे येथील झालेल्या बैठकीत अजित पवार गटाने शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट करत शरद पवारांवरही टीकास्त्र सोडले. वय जास्त झालं. 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? तुम्ही आशीर्वाद द्या. तुम्ही शतायुषी व्हा, असे अजित पवार म्हणाले होते. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना खडे बोल सुनावले.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
एक सांगते मी महिला आहे. छोटसं काही बोललं तरी टचकन डोळ्यात पाणी येतं . पण जेव्हा संघर्षांची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच (महिला) अहिल्या होते , तीच ताराराणी होते आणि तीच जिजाऊ होते. ही लढाई एका व्यक्ती विरोधात नाही , तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीविरोधात आपला लढा आहे. काही वर्षांपूर्वी माझं मन हळवं होतं, पण आता गेल्या चार-पाच वर्षांत ते घट्ट झालंय. ज्यांच्यामुळे हे झालं त्यांना धन्यवाद, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
शरद पवारांच्या वयाबद्दल बोलत त्यांना निवृत्त होण्यास सांगणाऱ्या अजित पवारांवर सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला. काही लोक, आता वय झाल्याने जेष्ठ नेत्यांनी केवळ आशिर्वाद द्यावेत असा सूर आळवत आहेत. पण वय हा फक्त आकडा आहे, जिद्द पाहिजे.
रतन टाटा या वयातही काम करतात. वयाची ८० वर्ष उलटल्यानंतरही अमिताभ बच्चन हे जाहिरातीत आणि मोठ्या पडद्यावर दिसतात ना, याचा दाखला सुप्रिया सुळे यांनी दिला. आपल्या वडिलांना म्हणायचं की, तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद द्या ,असं म्हणणाऱ्या पोरांपेक्षा मुलीच चांगल्या, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना सुनावलं. घरावर संकट आले, अडचण आली की मुलीच धावून येतात, असे सूचक वक्तव्यही सुप्रिया सुळे यांनी केले.
महिलांना निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण द्या ..
“यापुढे संघर्ष होईल, आठ नऊ खुर्च्या मोकळ्या झाल्यात. या खुर्च्यांवर नवीन लोकांना बसण्याची संधी मिळेल. मी शरद पवारांना विनंती करणार आहे की नवीन उमेदीने पक्ष आज सुरू होणार आहे. का नाही तुम्ही स्वतःहून या निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण महिलांना देत? नवीन उमेदीने पक्षाच्या कामाला लागू”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“माझा विश्वास आहे की महाराष्ट्रातील जनता याच योद्धाच्या मागे उभा राहील. पुन्हा आपल्याला करायचं आहे, जिद्दीने लढू. राष्ट्रवादीचा झेंडा चिन्ह आपल्याकडेच राहील. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच शिक्का आहे त्याचं नाव शरद पवार”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.