Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

DhuleAccidentNewsUpdate : ब्रेक निकामी झाल्याने ,खडी वाहतूक करणाऱ्या कंटेनरने चिरडले , १० ठार ३० जखमी ..

Spread the love

शिरपूर : समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा अपघात होऊन २६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता धुळे – मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी भीषण अपघात झाला. शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनरने दोन कारला धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला अल्पोपहार आणि चहा विक्री करणाऱया हॉटेलमध्ये शिरला. कंटेनरच्या धडकेने अल्पोपहार करण्यास बसलेल्या नागरिकांपैकी १० जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३० जण गंभीर जखमी झाले.

या अपघाताची अधिक माहिती अशी की  , आग्राहून मुंबईच्या दिशेने खडी वाहतूक करणारा कंटनेर सोमवारी अपघातग्रस्त झाला. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे कंटेनरवर नियंत्रण राहिले नाही. परिणामी अनियंत्रित कंटेनरने दोन कारला धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला अल्पोपहार आणि चहा विक्री करणाऱया हॉटेलमध्ये कंटेनर शिरला. कंटेनरच्या धडकेने अल्पोपहार करण्यास बसलेल्या नागरिकांपैकी १०  जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर काहीजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर उलटला.

मृतदेहाची ओळख पटविणेही झाले कठीण ..

हा अपघात इतका भीषण होता की , अपघातात मरण पावलेल्यांपैकी काहींच्या मृतदेहाची ओळख पटविणेही कठीण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघातील जखमींना शिरपूर येथील जिल्हा उपरुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातस्थळी जमा झालेल्या नागरिकांपैकी काहींनी जखमींना तसेच अपघातग्रस्त वाहने हटविण्यासाठी मदत केली.

अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शर्मा, आमदार काशीराम पावरा यांच्यासह पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, शिरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील ,नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, सांगवी पोलीस ठाण्याचे खलाणे, महामार्ग विभागाचे निरीक्षक हेमंतकुमार पवार, उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा तसेच नरेंद्र पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.

मृतांची नावे

मृतांमध्ये अपघात ग्रस्त कंटेनर चे चालक कन्हैयालाल बंजारा तसेच सुरपाल सिंह जवान सिंह राजपूत यांचा देखील समावेश आहे. बस थांब्यावर उभे असलेले असलेले प्रतापसिंग भीमसिंह गिरासे (वय 70 राहणार पळासनेर), निर्मला तेरसिंग पावरा( वय 17 राहणार कोळसापाणी पाडा) मुरी सुरसिंग पावरा( वय 28 राहणार कोळसापाणी पाडा) , पंकज पिंजा पावरा( वय ७, रा. कोळसापाणी), संजय जायमल पावरा (वय 38 रा. कोळसा पाणी) रितेश संजय पावरा (वय १४ रा. कोळसा पाणी) मृत झाले. तसेच कारमधील सुनीता राजेश खंडेलवाल (रा. धुळे) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तसेच धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना दशरथ पावरा यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे.

अपघातात 30 जण जखमी

या अपघातात 30 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने शिरपूर येथील कुटीर रुग्णालय तसेच इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात हलवण्यात आले. यातील 20 जणांना धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. यातील चौघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.

या भीषण अपघाताची माहिती कळाल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने भ्रमणध्वनीवरून पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली. त्याचप्रमाणे जखमींच्या उपचारासाठी कोणतीही कुचराई होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना देखील दिली. या जखमींच्या विचारपूस करण्यासाठी पालकमंत्री महाजन हे मुंबई येथून धुळ्याकडे रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून ते वैद्यकीय महाविद्यालयातील जखमींची विचारपूस करणार आहे. दरम्यान नाशिक विभागाचे पोलीस महासंचालक डॉ बी जी शेखर पाटील हे देखील अहमदनगर येथून धुळे शहराकडे येण्यासाठी निघाले असून सायंकाळी उशिरा ते घटनास्थळाची पाहणी करणार असून जखमींची विचारपूस देखील करणार आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!