Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BuldanaBusAccidentUpdate : आरटीओ ने दिला आपला प्राथमिक अहवाल , शिंदे -फडणवीस यांची घटना स्थळाला आणि जखमींना भेट , विरोधकांची टीका …

Spread the love

बुलडाणा : आजचा शनिवार महाराष्ट्रासाठी काळा शनिवार ठरला . शुक्रवार ते शानिवार दरम्यान राज्यातील विविध अपघातात १२ जण ठार झाले हे वृत्त ताजे असतानाच सकाळी विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी बसचा भीषण अपघात झाल्याचे धक्कदायक वृत्त आले. महाराष्ट्राला हादरविणारा हा अपघात झाला याचा तपास आता चालू आहे . ही बस एसी बस असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातून ड्रायव्हर वाचला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

या अपघातानंतर आता तपास सुरू झाला आहे. आरटीओकडून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात आणि ड्रायव्हरने दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार टायर फुटून भीषण अपघात झाला. मात्र आरटीओनं दिलेल्या अहवालात बसचा टायर फुटलाच नाही अशी माहिती समोर आली आहे. टायर फुटल्याने बसचा अपघात झाला नाही. बस अपघातातबाबत अमरावतीच्या आरटीओने अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी गृह विभागाकडून अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याची भेट

अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले आजचे सर्व नियोजिय कर्यक्रम रद्द करून आज समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातस्थळाला भेट देऊन पाहणी केली. या अपघातामागची कारणे त्यांनी यावेळी जाणून घेतली. तसेच समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा तज्ज्ञाकडून अभ्यास केला जाईल. हे अपघात होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल समृद्धी महामार्गावर होत असलेले अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात आहेत. अनेकदा ओव्हर स्पीडमुळे असे अपघात होतात. चालकांनी वाहतूक नियमांंचं पालन करावे असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले आहे.असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

विरोधकांचे टीकास्त्र

दरम्यान आता या अपघातावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुलढाणा अपघातावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. हा अपघात नसून घात आहे. तसेच याला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघेही जबाबदार असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. जलील पुढे म्हणाले की, कोणताही एक्सप्रेस-वे किंवा सुपर एक्सप्रेस-वे तयार होतो त्यावेळी रोड सेफ्टीचे नियम असतात. त्यामुळे समृद्धी महामार्गबाबत रोड सेफ्टीचे क्लियरेंस मिळाले होते का?, या महामार्गावर नेहमीच अपघात का होतात?. मी फक्त याच अपघातबद्दल बोलत नाही. मात्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी मिडीया इव्हेंट करण्यात आला. उपमुख्यमंत्री फडणवीस गाडी चालवत आहे, त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री शिंदे बसले असल्याचे दाखवण्यात आले. या दोघांना फक्त काळजी याची वाटत होती की, आपली सत्ता गेल्यावर दुसरं कोणीतरी याचं उद्घाटन करेल. यासाठीच घाईघाईने या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि त्याचेच हे परिणाम आहे. त्यामुळे याला मी अपघात म्हणत नाही. ही हत्या असून, या हत्यांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघे जबाबदार असल्याचे जलील म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

हे वृत मन हेलावणारे असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरुच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले आहेत. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करत आहे.

दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेवर भाष्य करताना, अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात, असे म्हणत सरकारला लक्ष्य केले. तर, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या अपघाताच्या मालिकेवरुन सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे.

समृद्धीवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. २५ लोक ज्या पद्धतीने मरण पावले हे दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला त्याच्या खोलात जावे लागेल. ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने निर्णय केले. त्या अनेक गोष्टी तपासाव्या लागतील. भविष्यात त्या सर्व गोष्टी समोर येतील. दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, लोक मृत्यू होत आहेत हे काही चांगले नाही, किती वेळा श्रद्धांजली वहायच्या, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अजित पवार काय म्हणाले ?

समृद्धी महामार्गावर झालेला अपघात हा गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या अपघातामधील मोठा अपघात आहे. या महामार्गाच्या उद्घाटनापासून येथे सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे, सरकारने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच, सरकारने तातडीने या अपघातांच्या संदर्भात तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मार्ग काढावा, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे. घडलेली घटना अतिशय दु:खद असून सर्व पीडित कुटुंबीयांप्रति अजित पवार यांनी सहवेदनाही व्यक्त केल्या आहेत. तसेच, खराब हवामानामुळे मला हेलिकॉप्टरने घटनास्थळी जाता येणार नाही. मात्र, मी खासगी विमानाने तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!