IndiaNewsUpdate : ब्रिजभूषण सिंहला वाचवण्यासाठी सरकारची योजना : राकेश टिकैत

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून आरोपपत्र दाखल केले आहे. BKU नेते राकेश टिकैत यांचे वक्तव्य समोर आले आहे. यावर भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, लैंगिक शोषणाच्या आरोपांनी घेरलेल्या ब्रिजभूषण सिंह यांना वाचवण्यासाठी सरकारची ही योजना असल्याचं त्यांनी म्हटले आहे. किसान युनियन यापुढेही कुस्तीगीरांना पाठिंबा देत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. वास्तविक, बीकेयू भाजप नेत्याच्या विरोधात कुस्तीपटूंना पाठिंबा देत आहे.
काय म्हणाले राकेश टिकैत?
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, “हे पैलवान अनेक महिन्यांपासून विरोध करत आहेत. ते आणखी काय करू शकतात? सरकार आपल्या माणसांना वाचवते… संपूर्ण योजना त्याला (ब्रिजभूषण सिंग) वाचवण्यासाठी आहे. पैलवानांनी साक्ष दिली, महिनाभर विरोध केला. आता ते आणखी किती संघर्ष करू शकतात? आंदोलकांना फोडण्याचे कामही ते करतात.
आपले म्हणणे मांडताना ते म्हणाले, “जेव्हा भाजपने इतर पक्षांचे नेते आणि उद्योगपतींना आपल्या गोटात घेतले आहे, तेव्हा हे पैलवान फक्त मुले आहेत आणि त्यांचीही कुटुंबे आहेत. ते तुटतील.” दरम्यान, आज शुक्रवारी (१६ जून) उत्तराखंडमध्ये एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही राकेश टिकैत यांनी सांगितले. १८ जूनपर्यंत हा कार्यक्रम चालणार असून तो शेतकऱ्यांशी संबंधित असेल.