Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : शिवसंवाद यात्रेतील गोंधळ आणि आदित्य ठाकरेंची दिलगिरी…

Spread the love

औरंगाबाद : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्प्यात  औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील महालगावमध्ये शिवसंवाद यात्रेचा मेळावा सुरु असताना बाजूलाच रमाबाई यांची जयंती साजरी केली जात होती. ही सभा सुरु असताना थोडा वेळ मिरवणुकीतील डीजे थांबव्याची विनंती पोलिसांनी केल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सभेत गोंधळ करून आदित्य ठाकरे यांच्या गादीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे वृत्त आहे.


यावर आपली प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते आ. अंबादास दानवे यांनी हा सर्व प्रकार शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे. तर आदित्य ठाकरे यांनी संविधानाच्या रक्षणासाठी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आलीय. काही अडचण आली असेल तर माफी मागतो. पण एवढे मोठे कारण नाही असे बोलून या वादावर पडदा टाकला आहे.

हा सर्व प्रकार चालू असताना आदित्य ठाकरे भाषणाला उभे राहताच त्यांनी स्टेजवर भाषण न करता खाली उतरून भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीलाच आदित्य यांनी दिलगिरी व्यक्त करून तुम्ही डीजे वाजवून जयंती साजरी करा, असं देखील म्हटले. मेळावा संपल्यानंतर जयंती साजरी करत असलेल्या लोकांनी आदित्य ठाकरे आणि दानवे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आदित्य ठाकरे यांची गाडी सुरक्षा रक्षकांनी व्यवस्थित बाहेर काढली.

आदित्य ठाकरेंची माफी…

या सर्व प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की , मी माईकवर बोललो, काही कारणास्तव साऊंड बंद झाला असेल. एकमेकांना समजून घ्यावे लागते. मी माईकवर माफीही मागितली. संविधानाच्या रक्षणासाठी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आलीय. काही अडचण आली असेल तर माफी मागतो. पण एवढे मोठे कारण नाही. डीजे ५-१० मिनिटांसाठी बंद केला असेल. पण मी माईकवर सांगितले डिजे चालू द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या गोंधळामागे गद्दारांमधले कुणी होते का? हे तपासावं लागेल, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांकडे इशारा केला आहे.

आदित्य ठाकरेंची सुरक्षा वाढवा: अंबादास दानवे यांची मागणी

आदित्य टाकरेंची संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रा सुरु आहे. सातव्या टप्प्यात वैजापूर तालुक्यातील एका गावात सभा सुरु असताना दगड फेकण्यात आले. सभा स्थळावरुन ठिकाणावरुन निघताना काही जणांनी दगडफेक केली. वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या नावाच्या घोषणा दिल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. महाराष्ट्रातील सरकार आताचे जे सरकार आहे ते समाजासमाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहे , असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत कसूर झालेली आहे. स्थानिक पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असल्याचे  अंबादास दानवे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेवरुन अंबादास दानवे आक्रमक झाले होते.

भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत असल्याने हे कारस्थान

दरम्यान आदित्य ठाकरे त्यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. राज्यात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहे त्यामुळे काही लोकांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊ नये म्हणून हे कारस्थान करण्यात आले. आंबेडकरी समाज आणि हिंदू समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे  दानवे यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!