AurangabadNewsUpdate : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम काळे यांचा विक्रम …!!

औरंगाबाद : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघात खरं तर तिहेरी लढत होती. राष्ट्रवादीचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील आणि सूर्यकांत विश्वासराव यांच्यामध्ये चुरसीचा सामना पाहायला मिळाला. विक्रम काळे यांनी 20195 मतं मिळवून या निवडणुकीत विजय मिळवला. तर भाजपच्या किरण पाटील यांना 13570 मतं मिळाली. तर अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी भाजपच्या पाटलांपेक्षा अधिक म्हणजेच 13604 मतं मिळवली. दरम्यान, नागपूरपाठोपाठ औरंगाबादमध्ये मविआच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे.
विक्रम काळेंनी आपल्या प्रचारात जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा अधोरेखित केला होता. त्यावेळी त्यांनी असेही म्हटले होते की, ‘मी एकमेव आमदार आहे की, जो म्हणतोय की.. आमदारांची पेन्शन बंद करा पण शिक्षकांची पेन्शन मात्र सुरू करा. हे मी लिहून देखील दिलं आहे.’ दरम्यान, मतमोजणीनंतर माध्यमांशी बोलताना विक्रम काळे म्हणाले की, ‘मराठवाड्यातील शिक्षक बंधू-भगिनींनी चौथ्या वेळेस विधान परिषदेवर पाठविण्याचं काम केलं आहे. त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो विश्वास सार्थ ठरविण्याचं काम माझ्या हातून होईल. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असलो तरी सातत्याने सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळेच हा विजय मी मिळवू शकलो. त्यामुळे या पुढच्या काळात शिक्षक हीच माझी जात, शिक्षक माझा धर्म, शिक्षक हाच माझा पक्ष हे ब्रीद घेऊन मी पुढे चालेल.’
त्यांच्या टीकेला मी कुठे उत्तर देत बसू… ?
‘यापुढच्या काळात मी पहिल्या दिवसापासून कामाला लागलेला असतो. उद्यापासूनच तुम्हाला मी मराठवाड्यातील एखाद्या शाळेत दिसून येईल. कारण माझी बांधिलकी ही शिक्षक कर्मचाऱ्यांशी आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन मिळवून देणं यासारखे विविध प्रश्न सोडविण्याचं काम मी करणार आहे. टीका-टिप्पणी करत राहतात लोकं. पण तुम्ही माझ्या प्रचाराचं तंत्र पाहिलं असेल. मागील तीनही निवडणुकीत मी कोणत्याही उमदेवाराच्या टीकेकडे लक्ष दिलं नाही. मी कधीही त्याला प्रत्युत्तर देखील देत नाही. कारण माझ्यापुढे डोंगराएवढं काम आहे. ते पूर्ण करण्यासाठीच माझ्याकडे काम नाही. तर त्यांच्या टीकेला मी कुठे उत्तर देत बसू.. कारण ही काही साखर कारखान्याची निवडणूक नाही. ही बुद्धीवंत आणि विचारवंतांची निवडणूक आहे. शिक्षणाने आम्हाला विवेक आणि विचार दिलेला आहे. त्यामुळे हे विचारपूर्वक मतदान करणारे माझे मतदार आहेत.’ असं विक्रम काळे यावेळी म्हणाले.