Stock Market Update : गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान, शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे

मुंबई : आजचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे ठरले आहे. गुरुवारच्या सुट्टीनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने बाजाराचा मूड आणखीच बिघडला असून, त्यामुळे आज दिवसभर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी प्रचंड नफा बुक केला आहे. सेन्सेक्स 60,000 अंकांच्या खाली घसरला. एका क्षणी सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली आला होता. आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 1.45 टक्के किंवा 874 अंकांच्या घसरणीसह 5930 अंकांवर बंद झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 400 अंकांच्या जवळपास घसरला होता. आणि निफ्टी 287 अंकांच्या घसरणीसह 17,604 अंकांवर बंद झाला आहे.
बाजारातील आजच्या घसरणीने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 269.74 लाख कोटी रुपयांवर घसरले. तर बुधवार, 25 जानेवारी रोजी मार्केट कॅप 276.69 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या ट्रेडिंग सत्रात 6.95 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे जवळपास 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
आजच्या सत्रात टाटा मोटर्सचे समभाग 6.34 टक्के, आयटीसी 1.77 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.71 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.51 टक्के, एनटीपीसी 0.21 टक्के, सन फार्मा 0.08 टक्के वाढीसह बंद झाले. एसबीआय 5.01 टक्क्यांनी, आयसीआयसीआय बँक 4.41 टक्क्यांनी, इंडसइंड बँक 3.43 टक्क्यांनी, अॅक्सिस बँक 2.07 टक्क्यांनी, कोटक महिंद्रा 2.03 टक्क्यांनी, टेक महिंद्रा 1.97 टक्क्यांनी घसरले.
दरम्यान आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग क्षेत्र, आयटी, पीएसयू बँक, वित्तीय सेवा, धातू. मीडिया, ऊर्जा, इन्फ्रा आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. तर ऑटो, फार्मा, एफएमसीजी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील समभागात तेजी आली. 50 निफ्टी समभागांपैकी 13 समभाग वाढीसह बंद झाले तर 37 समभाग घसरले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 8 समभाग वाढीसह आणि 22 तोट्यासह बंद झाले.