MaharashtraPoliticalUpdate : …तर आम्ही भाजपशीही युती करायला तयार , प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान …

लातूर : “भाजप जर मनुस्मृतीचा त्याग करत असेल तर आम्ही भाजपशीही युती करायला तयार आहोत. भारतात कोणीही कुणाचा शत्रू नाही. सर्वच भारतीय आहेत. फार फार तर टोकाचे मतभेद असू शकतात. पण भाजपने आमची अट मान्य केली तर भाजपसोबतही आम्ही युती करु शकतो”, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले. ते लातूरमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, “राजकारणात कोणताही पक्ष कुणाचाही कायमस्वरुपी दुश्मन नाही. भारतीयांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात पण दुश्मनी असू शकत नाही. आरएसएस आणि भाजपशी आमचे टोकाचे मतभेद आहेत. मी अनेकवेळा जाहीर मंचावरुन ते मांडलेही आहेत. पण भाजप आजही मनुस्मृती मानते. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. भारतीय जनता पक्ष जर मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत काम करायला तयार असेल तर आम्ही त्यांच्या सोबत घरोबा करु शकतो”
दरम्यान मनृस्मृती सोडायची म्हणजे काय करायचं? याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की , महाडला बाबासाहेब आंबेडकर यांनी जशी मनुस्मृती जाळली होती, तेच मोहन भागवत यांनी नागपूरला करावे . मनुस्मृती हा धर्मग्रंथ नाही. ती हिंदू धर्मातील सामाजिक, राजकीय व्यवस्था कशी असावी हे सांगणारा ग्रंथ आहे. त्यात भाजप, संघ बदल करणार असेल. तर त्याचे स्वागत करू.