MumbaiNewsUpdate | छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी ९ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार – जिल्हाधिकारी राजीव निवतकर
सर्वसाधारणपणे मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती. आता जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार म्हणून नोंदणी करता येईल, अशी माहिती (mumbai) मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर (Rajeev Nivatkar) यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी (Voter list) प्रसिध्द करण्यात येणार असून ही मतदार यादी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवलोकनार्थ उपलब्ध असेल, यासंदर्भात दावे व हरकती दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील तर दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाईल.
मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार १ जानेवारी, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी तयार करणे, ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे. तसेच ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी आहे. त्याचप्रमाणे, दि.१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिव्यांग व महिलांसाठी आणि दि.२६ व २७ नोव्हेंबर, २०२२ रोजी तृतीयपंथी व देह व्यवसाय करणाऱ्या महिला, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींची मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
या कालावधीत दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी १८ वर्ष वय पूर्ण होत असलेल्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार असून ज्या नागरिकांचे दि. १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १८ वर्ष वय पूर्ण होणार आहे, ते पण नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज करु शकतील, असे जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भातील दावे व हरकती असल्यास त्या दिनांक २६ डिसेंबर २०२२ पर्यंत निकालात काढण्यात येणार आहेत आणि यानंतर दि. ५ जानेवारी, २०२३ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाईल. या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मुंबई शहर जिल्हयातील नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी आणि यासंदर्भात काही दावे व हरकती असल्यास त्या सुद्धा कळवाव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी केले आहे.