MaharshtraNewsUpdate : जन्मठेपेच्या आरोपातून जीएन साईबाबा यांची निर्दोष मुक्तता , राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात …

नागपूर : माओवाद्यांशी संबंध आणि त्यांच्या कारवायांमध्ये मदत केल्याच्या आरोपात अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची मुंबई हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली. नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला. साईबाबा यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेप सुनावली होती. त्यानंतर साईबाबा आणि इतर आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले होते. या निकालाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून यावर आज सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साईबाबा यांची सुटका दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
न्या. रोहित देव आणि न्या. अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना आरोपींची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. वर्ष २०१७ मध्ये गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात साईबाबा यांनी हायकोर्टात धाव घेतली. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात साईबाबा यांना २०१४ मध्ये अटक करण्यात आली होती. साईबाबा हे ९० टक्के दिव्यांग असून ते व्हिलचेअरवर असतात. सध्या ते नागपूर मध्यवर्ती तुरुंगात आहेत.
मार्च २०१७ मध्ये गडचिरोली कोर्टाने साईबाबा यांच्यासह एक पत्रकार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका विद्यार्थ्यांसह अन्य एकाला माओवाद्यांशी संबंध आणि देशाविरोधात युद्ध पुकारण्याच्या कटात सामिल असल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. सप्टेंबर२०२२ पासून त्या याचिकेवर नियमित सुनावणी झाली. २९ सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण होऊन खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर हायकोर्टाने आज निकाल सुनावला. साईबाबा यांच्यासह अन्य पाच आरोपीही दोषमुक्त असल्याचे सांगत सर्वांची तातडीने सुटका करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले. तुरुंगात असलेल्या पाच पैकी एका आरोपीचा न्यायालयीन कोठडीत असताना आजाराने मृत्यू झाला.