AurangabadNewsUpdate : ज्येष्ठ पत्रकार के.एम. देवळे यांचे निधन

औरंगाबाद : फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ पत्रकार के.एम. देवळे , रा. पवननगर हडको, औरंगाबाद यांचे दिनांक १६ रोजी दुपारी २ वाजता अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय-७२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, नात, सुन, जावई, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर हर्सुल टी पाँईट रोडवरील एसबीए शाळेसमोरील स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले.
के.एम. देवळे हे औरंगाबाद शहरातील अंजिठा या दैनिकात उपसंपादक म्हणून २० वर्षे कार्यरत होते. तसेच त्यांनी शहरातील अनेक दैनिकात आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटविला. दैनिक महानायक, लोकनायक, लोकप्रबोधन या आंबेडकरी चळवळीच्या दैनिकातही देवळे यांनी काम केले. चळवळीच्या दैनिकात पत्रकारिता करण्यात देवळे यांना जास्त रस होता. बहुजन समाज पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून देवळे यांची शहरात ओळख होती.
पत्रकारिता करण्याबरोबरच त्यांनी आंबेडकर चळवळीचेही काम केले. त्यांच्या निधनाने मराठवाड्याच्या पत्रकारितेतला एका चांगला मित्र आणि तारा निखळला आहे. त्यांना सर्वत्र बापू म्हणून ओळखले जायचे. देवळे यांना महानायक परिवाराची आदरांजली.
सामाजिक बांधिलकी मानणारा पत्रकार : विष्णू ढोबळे
आयुष्यमान देवळे खऱ्या अर्थाने जेष्ठ पत्रकार होते. त्यांचा अजिंठा पासूनचा प्रवास मी पाहत आलो ,निष्ठावान सामाजिक बांधिलकी मानणारा पत्रकार गेला. अगदी आरंभीच्या काळात कांशीरामच्या बाजूने ते अगदी लो टोनमध्ये सामाजिक बांधिलकीचा पदर घट्ट धरून असायचे. हे व्रत त्यांनी प्रामाणिकपणे आयुष्यभर पाळले, त्या मुळे ते खऱ्या अर्थाने आदरास पात्र होते. ते आपल्या सगळ्यांचे मित्र होते. चळवळीतल्या अनेक प्रश्नांना त्यांनी त्यांच्या परीने उजाळा देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाण्याने विचार आणि सामाजिक बांधिलकी याचा मेळ घालणारा आपण आपला मित्र गमावला आहे . त्यांच्या जाण्याने फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळीचे मोठे नुकसान झाले यात शंकाच नाही .समाजवादी जन परिषदेच्या वतीने आयु. देवळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
विष्णू ढोबळे
अध्यक्ष समाजवादी जन परिषद ,महाराष्ट्र.