JalgaonNewsUpdate : वादग्रस्त पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर निलंबित , मराठा समाजाविषयी केले होते आक्षेपार्ह वक्तव्य …

जळगाव : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मराठा समाजाचा वाढता संताप लक्षात घेत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी हे निलंबनाच्या आदेश जारी केले आहेत.
आपल्या एका सहकाऱ्याशी बोलता असताना पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याने मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणावरून बकाले याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मराठा समाजातील विविध संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत बकाले याची पोलीस नियंत्रण कक्षात तत्काळ बदली करण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी बकाले त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली .
दरम्यान या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार असून पोलीस उपाधीक्षक यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर सविस्तर अहवाल लवकरात लवकर पाठवावा, असंही विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी शेखर यांनी पारित केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
किरणकुमार बकाले याने केलेलं वक्तव्य हे पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे असून अशा प्रवृत्तींना पाठीशी घातले जाणार नाही. बकाले याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून कायदा व सुव्यवस्था अडथळा निर्माण होईल, असे कुठलेही कृत्य मराठा समाजाने करू नये, तसेच पोलीस दलास सहकार्य करावे , असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केलं आहे.