AurangabadCrimeNewsUpdate : गुन्हे शाखेकडून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला अटक…

औरंगाबाद : बनावट नोटा छापून चलनात आणणाऱ्या सहा जणांच्या टोळीला औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी पुंडीलनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींकडून २५ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटांसह १ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी हि माहिती दिली आहे.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने शहरातील शिवाजीनगर परिसरात सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांचा एक साथीदार फरार आहे. या कारवाईत पोलिसांनी १०० रुपयांच्या २५७ बनावट चलनी नोटा, नोटा विक्री मधून आलेले २१ हजार ५०० रुपये, एकूण पाच मोबाईल हॅन्डसेट ,गुन्हयात वापरलेली मोपेड ,छपाई साठी लागणाऱ्या शाईच्या बॉटल, नोटा कटींग करण्याचे मशिन असा मुद्देमाल जप्त केला आहे.
असा लावला सापळा…
गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकास एक व्यक्ती दुचाकीवर (एमएच २० एफवाय ९६७९) बनावट नोटा खऱ्या म्हणून वापरण्यासाठी शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि. शिंदे यांच्या पथकाने सापळा लावला. औरंगपुरा भागातुनच दुचाकीवर पथक नजर ठेवुन होते. हनुमंत अर्जुन नवपुते (रा. घारदोनगाव, ता. औरंगाबाद) व किरण रमेश कोळगे (रा. गाडीवाट, ता. औरंगाबाद) या दोघांना शिवाजीनगर येथे पकडले.
ही कारवाई निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनात सपोनि मनोज शिंदे, हवालदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, अश्वलिंग होणराव, विशाल पाटील, विलास मुठे, रविंद्र खरात, नितीन देशमुख, आनंद वाहुळ, रमेश गायकवाड यांच्या पथकाने केली.
दरम्यान गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत करत हनुमंत अर्जुन नवपुते (वय २१ वर्ष रा. धारदोनगाव ता.जि. औरंगाबाद), २३०किरण रमेश कोळगे (वय २३ वर्ष रा. गाडीवाट ता. जि. औरंगाबाद), चरण गोकुळसिंग शिहरे (वय ४० वर्ष रा. घारदोन ता. जि. औरंगाबाद), प्रेम गोकुळ शिहरे (वय २६ वर्ष रा. सदर), संतोष विश्वनाथ शिरसाठ (वय ४७ वर्ष रा. राजीवनगर, रेल्वेस्टेशन, औरंगाबाद), हारुणखान पठाण (रा. बायजीपुरा, औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले आहे. आंबादास ससाणे नावाच्या व्यक्तीच्या मार्फत बनावट चलनी नोटा चलनात आणण्याचे रॅकेट चालत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला परंतु तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला लागला नाही.