Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SivsenaNewsUpdate : शिवसेनेच्या याचिकांवरील सुनावणी उद्याच्या ऐवजी होईल परवा…

Spread the love

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वादासंबंधीच्या याचिकांवर उद्या होणारी सुनावणी त्रिसदस्यीय खंडपीठाचे एक न्यायमूर्ती सी. टी . रवीकुमार उद्या उपस्थित होणार नसल्यामुळे एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. हि सुनावणी आता परवा म्हणजे २३ ऑगस्टला होणार आहे.


या प्रकरणाची मागील सुनावणी  ४ ऑगस्टला घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान दुसरीकडे खरी शिवसेना कुणाची ? या मुद्द्यावर आता निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरु आहे. आयोगाने दिलेल्या नोटीसचे उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. पण आयोगाने  दोन आठवड्यांचाच वेळ दिला आहे. त्याची मुदतही २३ ऑगस्टलाच  संपत असून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी देखील २३ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.

एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्टला होत आहेत  निवृत्त…

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या पाच याचिकांवर सरन्यायाधीश व्ही. एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणावर सखोल कायदेशीर युक्तिवाद होण्याची गरज असेल तर हे प्रकरण व्यापक घटनापीठाकडे देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे मत गेल्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश व्ही. एन. रमणा यांनी मांडले होते. त्यामुळे या प्रकरणी घटनापीठ स्थापन करण्यासंदर्भात न्यायालय काय निर्णय देते, याकडे दोन्ही गटांसह राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून, त्याआधी निर्णय होण्याची आशा शिवसेनेला आहे.

काय आहेत याचिका ?

या याचिकानुसार  शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. कोर्टात शिंदे-ठाकरे गटामध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. दरम्यान शिवसेना आमचीच आहे असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या कायदेशीर लढाईत शेवटची सुनावणी ४ ऑगस्टला झाली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलली आहे. आधी १२ ऑगस्ट, त्यानंतर २२ आणि आता २३ ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे.

शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

शिवसेना विरुद्ध शिंदेसेना यासंदर्भातील विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच शिवसेना कुणाची या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवरील सुनावणी आधी घेण्यात यावी, अशी याचिका उद्धव ठाकरे गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात मेंशन करण्यात आली. मात्र हा खटला घटनापीठासमोर चालवायचा की नाही, यासंदर्भातीलच निकाल होणे बाकी आहे. तसेच याबाबत आम्हाला निकाल देणे आवश्यक असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षावर दावा सांगितला आहे. उद्धव ठाकरे तसेच शिंदेसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंबंधीचे पुरावेही दाखल करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे गटासंबंधीच्या याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी झाल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली होती.

नागरिकांच्या वतीनेही याचिका

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या अनेक याचिकांमध्ये आता नागरिकांतर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करून नागरिक व मतदारांचे म्हणणेसुद्धा एकून घ्यावे, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकाकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, रंजन बेलखोडे, सौरभ अशोकराव ठाकरे (पाटील) यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या माध्यमातून दाखल केलेली हस्तक्षेप याचिकेवरही कोर्टात सुनावणी होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!