MaharashtraEducationNewsUpdate : बारावीचा निकाल जाहीर , यंदाही मुली मुलांपेक्षा पुढे , कोकण विभाग सर्वप्रथम …

मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून राज्यात एकूण ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.२१ टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला असून ९०.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुपारी १ वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. यावर्षीही एकूण निकालात ९५.३५ टक्के मुलींनी बाजी मारली आहे तर मुलांचे प्रमाण ९३.२९ आहे.
मंडळाने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार यावर्षी नेहमीप्रमाणे लेखी अभ्यासक्रमावर ७५ टक्के परीक्षा लेखी घेण्यात आली होती. तर किमान ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली होती. तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रकल्प यासाठी दोन कालावधी देण्यात आले होते. ७० ते १०० गुणांच्या प्रश्न पत्रिकांसाठी ३० मिनिटे अधिकच वेळ विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. तर ४० ते ६० गुणांच्या प्रश्न पत्रिकांसाठी १५ मिनिटे अधिकच वेळ देण्यात आला होता. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तिथे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले होते.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
कोकण- ९७.२१ टक्के
पुणे- ९३.६१ टक्के
नागपूर- ९६.५२ टक्के
औरंगाबाद- ९४.९७ टक्के
मुंबई- ९०.९१ टक्के
कोल्हापूर- ९५.०७ टक्के
अमरावती- ९६.३४ टक्के
नाशिक- ९५.०३ टक्के
लातूर- ९५.२५ टक्के
येथे पहा निकाल…
निकालाची प्रिंटही विद्यार्थ्यांना उपल्बध करून देण्यात आली आहे. त्यांच्या मूळ गुणपत्रिका संबंधित शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात १७ जूनला मिळतील असे मंडळाने कळविले आहे.