Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : रानडुक्कर अवैध शिकार प्रकरणी ८ जणांना अटक , न्यायलयाने सुनावली वन कोठडी

Spread the love

मनिषा पाटील / सोयगाव : घोसला ता.सोयगाव येथील राखीव वनात रान डुकराची अवैध शिकार केल्याच्या आरोपावरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ८ जणांना अटक केली असता या सर्व आरोपींना वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी कि , दि. २ गुरुवारी रोजी काही इसम अवैध शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहिती वन विभागास मिळाली. सदरील माहितीच्या अनुषंगाने राहुल सपकाळ वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव (प्रा.) हे त्यांच्या टीमसह तात्काळ घोसला राखीव जंगलाच्या दिशेने निघाले. सदर ठिकाणी पोहचले असता वनाधिकाऱ्यांना एक अज्ञात इसम पाठीवर रानडुक्कर घेऊन जात असताना दिसला.

दरम्यान वनाधिकारी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून आरोपीने रानडुक्कर खाली जमिनीवर टाकून डोंगराच्या दिशेने पळ काढला. या आरोपीचा वन अधिकाऱ्यांनी पाठलाग करून शिताफीने त्याला पकडले. सदरील आरोपीस विचारणा केली असता अजून ७ इसम त्याच्या सोबत असल्याची माहिती मिळाली. त्याच दरम्यान आपला साथीदार पकडला गेल्याचे दिसताच झुडुपात व डोंगराआड लपलेले इतर ७ आरोपी देखील बाहेर आले. त्यांना देखील वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

या सर्व आरोपींना वन अधिकाऱ्यांनी  प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सिल्लोड यांच्या कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ दिवसाची वन कोठडी (FCR) सुनावली.सदर वन गुन्ह्याचा पुढील तपास एस.व्ही.मंकावार उप वन संरक्षक औरंगाबाद श्रीमती पी.पी.पवार सहाय्यक वन संरक्षक सिल्लोड प्रा.यांच्या मार्गदर्शनखाली राहुल सपकाळ वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव प्रा. हे करत आहे.

सदर कार्यवाहीत एन. डी.काळे वनपाल बनोटी, वनरक्षक वाय. एस.बोखारे, एन.ए.मुलताने, व्ही.आर.नागरे,जी.टी. नागरगोजे, एस. हिरेकर, वनमजूर झाल्टे, दशरथ पंडित, झामु पवार,कृष्णा पाटील आदीचा सहभाग होता.

गेल्या सहा महिन्यांपासून कारवाईचा धडाका

मागील ६ महिन्यातील सोयगाव वन विभागाची ही अवैध शिकार प्रकरणी तिसरी धडक कार्यवाही सुरु आहे. यात खवले मांजर प्रकरण, कोऱ्हाळा बिटातील अवैध रानडुक्कर शिकार प्रकरण व जरंडी येथील बिबट्या  प्रकरण अशा विविध प्रकरणांचा समावेश आहे. वन परिक्षेत्र सोयगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत  न्यायालयाकडून सर्व आरोपींचा जामीन नामंजूर केला व आरोपींची हर्सूल जेलला रवानगी केली.

राहुल सपकाळ यांनी वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव या पदाचा कार्यभार घेतल्यापासून अवैध वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार, अवैध चराई, वन वणवा या घटनांना चाप बसला असून तालुक्यात वन विभागाची प्रतिमा देखील उंचावली आहे.त्यामुळे तालुक्यात कर्तव्यदक्ष विभाग म्हणून या विभागाकडे पाहिल्या जात आहे. वन कर्मचाऱ्यांच्या धडक कार्यवाहीमुळे वन तस्कारांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे.

वन व वन्यप्राणी संरक्षणाची उत्कृष्ट कामगिरी बजावल्या नंतर आता पुढील काळात सोयगाव वनविभाग अतिक्रमणमुक्त करण्याच्या दिशेने वनविभागाने पावले उचलले असून  एस व्हि मंकावार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राहुल सपकाळ वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव यांनी सांगीतले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!