MaharashtraNewsUpdate : आंबेडकरी चळवळीचा आवाज गेला, प्रतापसिंग दादा बोदडे यांचे निधन

जळगाव : फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्रसिद्ध गीतकार, गायक प्रतापसिंग बोदडे यांचे शुक्रवारी दुपारी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे आंबेडकरी चळवळीचा आवाज गेला. दोनच राजे इथे गाजले आणि भीमराज की बेटी मै तो जयभीम वाली हू, या प्रसिद्ध आणि गाजलेल्या गिताचे गायक आणि गीतकार आहेत.
रेल्वेमधील आपली नोकरी सांभाळून प्रतापसिंग बोदडे यांनी महाराष्ट्रभर छ्त्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले , शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आपल्या गीतातून प्रचार आणि प्रसार केला होता. लोककवी वामनदादा कर्डक यांचे ते आवडते कवी आणि गीतकार होते. वामनदादा यांचा त्यांच्यावर प्रभाव असल्याने अतिशय सोप्या भाषेत ते प्रबोधन करायचे. संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीत “दादा” म्हणून ते परिचित होते.
प्रतापसिंग बोदडे यांचा जन्म पूर्वीच्या एदलाबाद ( आताचे मुक्ताईनगर) येथे झाला होता. ते मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. पँथरच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी चळवळीला मोठे योगदान दिले होते. मराठी बरोबरच त्यांचे उर्दू आणि इंग्रजीवरही त्यांचे प्रभुत्व होते.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातही त्यांना काही दिवसांपूर्वी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
मुंबई येथे रेल्वेतून निवृत्त झा्ल्यानंतर ते मुक्ताईनगर या मूळ गावी वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जळगाव येथे आणण्यात आले. दुपारी १२.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा गायक कुणाल बोदडे आणि तीन मुली, असा परिवार आहे.