Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

TuljapurNewsUpdate : नेमका वाद काय आहे ? छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान , आज तुळजापूर बंद

Spread the love

गाभाऱ्यात फक्त कमाविसदार पुजारी यांनाच प्रवेश : मंदिर व्यवस्थापन


उस्मानाबाद :  छत्रपती संभाजीराजे यांना त्यांचे कुलदैवत असलेल्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्‍यात जाण्यापासून रोखून त्यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाकडून उद्या तुळजापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. समस्त तुळजापूरकर आणि सकल मराठा समाजाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुळजापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाचा मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात निषेध केला जात आहे .


राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात ते दर्शनासाठी गेले होते. मात्र  तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे सह जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे आणि मंदिराचे व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना मंदिराच्या गर्भगृहात चुकीची माहिती देऊन प्रवेश दिला नाही. तसेच त्यांनी संभाजीराजेंना अपमानास्पद वागणूक दिल्याने वरील दोन्ही अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करण्यासाठी तुळजापूर येथील नागरिक,  पुजारी, व्यापारी, शिवप्रेमी तसेच विविध सामाजिक संघटना यांच्याकडून उद्या तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

तुळजापुरात नेमके काय झाले ?

छत्रपती संभाजीराजे सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. संध्याकाळच्या सुमारास ते कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेले तेंव्हा त्यांना काही नियम सांगत गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारण्यात आला तेंव्हा अतिशय उद्विग्न होऊन संभाजीराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला परंतु त्याच काही एक परिणाम झाला नाही त्यामुळे मंदिरात वाद नको म्हणून संभाजी राजे हे मंदिरातून बाहेर निघाले. यामुळे संभाजीराजे छत्रपती हे संतापले. संभाजीराजे यांनी कारवाईचा इशारा दिला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. गाभाऱ्यात जाण्यास भाविकांना बंदी असली तरी हा नियम छत्रपती घराण्याला लागू होत नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही मंदिरात छत्रपतींना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले जात नाही, अशी परंपरा आहे. तहीरी हा प्रकार घडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्यानांतर  मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाने तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे.

कमाविसदार पुजारी यांचे व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही…

हा वाद चिघळत असल्याचे लक्षात येताच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्यावतीने करण्यात आलेल्या खुलाशात म्हटले आहे कि , छत्रपती संभाजी राजे यांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू किंवा कृती करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कवायत कलम ३६ नुसार कुळाचार विधी व्यतिरिक्त कमाविसदार पुजारी यांचे व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही, असा नियम आहे. करवीर संस्थान व संभाजीराजे छत्रपती यांच्या कालच्या गैरसोयीच्या कारणाने शासनाला कलम ३६ आणि उच्च न्यायालयातील प्रकरणाबद्दल सरकारकडे अहवाल पाठवला जात आहे. करवीर संस्थांनची मानाची पूजा छत्रपती संभाजीराजे यांच्या आगमनापूर्वी झालेली होती. यानंतर ते दर्शनाला येणार असतील तेव्हा करवीर संस्थानचा अभिषेक त्यांचे आगमन पाहून करावे, जेणेकरून त्यांचे हस्ते दुग्ध अभिषेक होईल, अशा सूचनाही आम्ही दिल्या आहेत.

कुळाचाराला बाधा येऊ नये यासाठी….

या खुलाशात असेही म्हटले आहे कि , करवीर संस्थान हे तुळजाभवानी मंदिराचे मानकरी असून त्यांचा मान ठेवणे हे मंदिर संस्थानचे कर्तव्य आहे. याबाबत कृपया कोणीही चुकीची माहिती प्रसारित करू नये. याबाबत तांत्रिक कारणाने नैमित्तिक कुळाचाराला बाधा येऊ नये यासाठी नियोजन करण्यासाठी मंदिर व्यवस्थापक यांनी करवीर संस्थानच्या प्रतिनिधींशी चर्चा करून यापुढे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत, असे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने म्हटले आहे.

तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी…

तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी आहे. तुळजापूर देवस्थान हे पूर्वापार कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या मालकीचे होते. युवराज संभाजीराजे यांचे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी देशाच्या स्वतंत्र्यानंतर तुळजाभवानी मंदिर भारत सरकारच्या स्वाधीन केले. यानंतरही छत्रपती घराण्याच्या पूर्वापार प्रथा, परंपरा आजही इथे पाळल्या जातात. दररोज भवानी मातेला पहिला नैवेद्य हा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा असतो. भवानी माता निद्रा घेते तो पलंग देखील कोल्हापूरचे छत्रपती महाराज अर्पण करतात. त्याच पलंगावर भवानी माता निद्रा घेते. मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती घराण्याने शेकडो एकर जमीन दान दिली आहे.

निजामानेही कधी इकडे हस्तक्षेप केला नाही …

विशेष म्हणजे हा भाग पूर्वी हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असताना सुद्धा भवानी माता छत्रपती घराण्याची कुलदेवता असल्यामुळे निजामाने देखील कधीही इथे हस्तक्षेप केला नाही. ब्रिटिशांनी कधीही इथे हस्तक्षेप केला नाही किंवा कोणते नियम लादले नाहीत, असे  मराठा क्रांती ठोक मोर्चाने म्हटले आहे. छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य भवानी मातेच्या दर्शनाला येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात, ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. युवराज संभाजीराजे देखील भवानी मातेच्या दर्शनास दरवर्षी न चुकता येत असतात. परंपरेनुसार ते गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतात.

चार महिन्यांपूर्वीच गाभाऱ्यात जाऊन घेतले होते दर्शन

यावेळी छत्रपतींच्या पुजाऱ्यांतर्फे आरती केली जाते. चार महिन्यांपूर्वी संभाजीराजे दर्शनास आले असता त्यांनी गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतले होते. मात्र, सोमवारी दर्शनासाठी आले असता त्यांना मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोण्यात आले. सरकारी नियम दाखवत महाराजांना मंदिरात जाण्यापासून रोखले गेले. आपल्या घराण्याची परंपरा आपल्याला पाळू द्या, अशी नम्र विनंती करून देखील त्यांना आतमध्ये प्रवेश करू दिला गेला नाही. खुद्द छत्रपतींना भवानी मातेपर्यंत जाण्यापासून रोखणाऱ्या या सरकारचा जाहीर निषेध, मराठी क्रांती ठोक मोर्चाने केला आहे.

मंदिर व्यवस्थापक तहसिलदार योगिता कोल्हे यांचे म्हणणे असे आहे ….

यामुळे समस्त महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचा हा अपमान केला आहे. सरकारने आणि प्रशासनाने समस्त महाराष्ट्राच्या जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल माफी मागावी आणि हा प्रकार पुन्हा घडू नये याची हमी द्यावी. जिल्हाधिकारी यांनी माफी मागावी. तसंच मंदिर व्यवस्थापक तहसीलदार व धार्मिक व्यवस्थापकास निलंबित करावे , अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे. दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांचा आम्ही आदर करतो त्यांचा अवमान करण्याचा आमचा हेतू नव्हता. काल रात्री देवीची अभिषेक धुप आरती झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे आले होते. देवुल ए कवायते कायदा कलम ३६ नुसार आम्ही अंमलबजावणी केली आहे, अशी प्रतिक्रिया मंदिर व्यवस्थापक तहसिलदार योगिता कोल्हे यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!